LPG Gas Booking | एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता अधिकृत एलपीजी गॅस कनेक्शन नसतानाही काही मिनिटांत सिलिंडर घरपोच मागवता येणार आहे. यासाठी क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इंस्टामार्ट आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी भागीदारी केली असून, देशातील पहिली ऑन-डिमांड एलपीजी सिलिंडर डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आली आहे.
या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना इंस्टामार्ट अॅपवरून थेट एलपीजी सिलिंडरची ऑर्डर देता येणार आहे. विशेष म्हणजे, या सेवेसाठी पारंपरिक गॅस कनेक्शनची आवश्यकता नाही. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणारे, विद्यार्थी, नोकरदार आणि वारंवार स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
10 किलोचा ‘HP Navya’ सिलिंडर उपलब्ध
या कराराअंतर्गत HPCL ने 10 किलो वजनाचा ‘HP Navya’ एलपीजी सिलिंडर बाजारात आणला आहे. याशिवाय, सध्या उपलब्ध असलेला 5 किलोचा एलपीजी सिलिंडर देखील इंस्टामार्टवरून मागवता येणार आहे.
या दोन्ही सिलिंडरसाठी स्वतंत्र एलपीजी कनेक्शनची गरज नाही. त्यामुळे गरज पडेल तेव्हा ग्राहक सहजपणे ऑनलाइन ऑर्डर करून सिलिंडर मिळवू शकतील.
पहिल्या टप्प्यात बंगळुरूत सेवा
सध्या या सेवेची सुरुवात बंगळुरू शहरातून करण्यात आली आहे. पुढील काळात इतर शहरांमध्येही ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
पहिल्यांदा KYC आवश्यक
या सेवेसाठी ग्राहकांना पहिल्यांदा KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे सिलिंडरची ऑर्डर देऊ शकतील.
HPCL च्या माहितीनुसार, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून सिलिंडर घरपोच पोहोचवला जाईल. तसेच HP Navya सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे, हे पाहण्यासाठी विशेष लेव्हल इंडिकेटरची सुविधाही देण्यात आली आहे.
या नव्या उपक्रमामुळे पारंपरिक गॅस कनेक्शनच्या अडचणीशिवाय गरजेच्या वेळी काही मिनिटांत एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार असल्याने लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
News Title: LPG Gas Booking online Swiggy Instamart HPCL Partner For Instant

