Shreyas Iyer | न्यूझीलंड विरुद्धची टी20 मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरत असून आगामी टी20 वर्ल्डकपच्या तयारीचा भाग म्हणून पाहिली जात आहे. या मालिकेत काही खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत असताना काही खेळाडू मात्र बेंचवरच अडकले आहेत. त्यातच आता श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
टी20 मालिकेपूर्वी तिलक वर्माला दुखापत (Tilak Varma injury update) झाल्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला होता. विजय हजारे ट्रॉफीदरम्यान त्याला दुखापत झाल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला. मात्र सुरुवातीच्या तीन सामन्यांत श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. (IND vs NZ T20)
तिलक वर्माचं पुनरागमन लांबलं :
तीन सामने झाल्यानंतर चौथ्या सामन्यापासून तिलक वर्मा संघात परत येईल अशी चर्चा होती. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिलक पूर्णपणे फिट असला तरी सेंटर ऑफ एक्सीलेन्सला तो टी20 वर्ल्डकपपूर्वी पूर्ण तयारीत असावा असं वाटत आहे. त्यामुळे त्याला थेट सामन्यात उतरवण्याऐवजी सराव सामन्यांत खेळवण्यावर भर दिला जात आहे. (IND vs NZ T20)
त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन टी20 सामन्यांतही तिलक वर्मा खेळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. याच कारणामुळे श्रेयस अय्यरला या दोन सामन्यांसाठी संघासोबत राहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकपपूर्वी त्याला भारतीय संघाच्या सेटअपमध्ये स्वतःला दाखवण्याची संधी मिळणार आहे.
Shreyas Iyer | श्रेयस अय्यरची प्लेइंग 11 मधील शक्यता कमी :
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा संघात समावेश असला तरी पहिल्या तीन सामन्यांत त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. उर्वरित दोन सामन्यांतही त्याला थेट मैदानात उतरवण्याची शक्यता कमी असल्याचं मानलं जात आहे. कारण श्रेयस अय्यर हा सध्या टी20 वर्ल्डकप संघाचा भाग नाही.
निवडकर्ते कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसल्यामुळे स्थिर संघसंयोजनावरच भर देत आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यर उर्वरित सामन्यांतही बघ्याच्या भूमिकेत राहण्याची शक्यता आहे. मात्र संघासोबत राहिल्यामुळे त्याला वातावरणाचा अनुभव मिळणार असून भविष्यातील संधीसाठी तो तयार राहू शकतो.






