Palash Muchhal | भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी संबंधित वाद आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. स्मृतीच्या बालपणीच्या मित्र विज्ञान माने याने पलाशवर 40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पलाशने विज्ञानवर 10 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली असून, या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विज्ञान माने याने स्पष्ट केले की, त्याने या नोटीसला आपल्या वकील रोहित पाटील यांच्यामार्फत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पलाश मुच्छलने आपली बदनामी केल्याचा आरोप करत हा दावा दाखल केला असला तरी, विज्ञानने त्याविरोधात गंभीर आरोप करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
अंडरवर्ल्डकडून धमकीचा आरोप :
विज्ञान माने याने दावा केला आहे की, तक्रार मागे घेण्यासाठी पलाश मुच्छलने (Palash Muchhal) त्याच्यावर दबाव टाकला असून थेट अंडरवर्ल्डमार्फत जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत त्याने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. न्यायासाठी लढा सुरूच राहील, मात्र सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचेही त्याने सांगितले आहे.
या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून, पोलिसांकडून याची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप पलाश मुच्छलने या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Palash Muchhal | चित्रपटातील व्यवहारातून वादाला सुरुवात :
पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि विज्ञान माने यांनी ‘नजरीया’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. विज्ञानने या प्रकल्पासाठी पलाशला आर्थिक मदत केली होती. मात्र, स्मृती मानधनाशी (Smriti Mandhana) लग्न मोडल्यानंतर पलाशने विज्ञानशी संपर्क तोडल्याचा आरोप आहे. पैसे परत देण्यास नकार देत त्याने विज्ञानला ब्लॉक केल्याचेही समोर आले आहे.
यानंतर विज्ञान माने यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत सर्व पुरावे सादर केले असून, आता पलाश मुच्छल या आरोपांवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






