Sanjay Shirsat | नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच तापला आहे. निवडणूक संपूनही गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वातावरण तापले असून, यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी थेट पलटवार केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट यांनी नाईकांच्या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले की, “गणेश नाईक तुमचं जास्त होतंय. कोणाला साफ करण्याची भाषा करताय? तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांमुळे सत्तेत आलात, हे विसरू नका. नवी मुंबईचे डोंगर किंवा रेतीची खदाने आहेत का साफ व्हायला? आम्ही हिंमतीने आणि जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर आला आहे. (Sanjay Shirsat Statement)
महायुतीच्या संयमाला आव्हान? :
शिरसाट पुढे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) साहेबांकडून काय आदेश घ्यायचे ते तुम्ही घ्या, पण आम्ही ऐकतो याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही, असा गैरसमज करून घेऊ नका. महायुतीचा धर्म आम्ही पाळतो आणि तुम्ही वारंवार आव्हान देणार असाल, तर ते आता सहन केले जाणार नाही.” त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, अशी भाषा कायम राहिली तर महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. (Ganesh Naik vs Eknath Shinde)
ते पुढे म्हणाले, “आम्ही साफ करून टाकू, उखडून टाकू, फेकून देऊ, ही भाषा कुणासाठी करताय? एकनाथ शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नका. त्यांनी घेतलेले निर्णय शांतपणे आणि संयमाने असतात. आम्ही आजही बोलत नाही कारण महायुतीत बिघाड होऊ नये, पण आव्हान दिलं तर ते स्वीकारायलाही आम्ही तयार आहोत.”
Sanjay Shirsat | गणेश नाईक नेमकं काय म्हणाले? :
दरम्यान, गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यात म्हटले होते की, “भाजपाने परवानगी दिली तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू. मात्र भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे, म्हणून पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला.” त्यांच्या या विधानानंतरच शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
नवी मुंबईच्या राजकारणात सुरू असलेल्या या शाब्दिक संघर्षामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. आगामी काळात या वादावर वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






