Uddhav Thackeray | राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने (Dinkarrao Mane) यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरू असताना हे पक्षांतर झाले आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटासाठी हा पक्षप्रवेश म्हणजे निवडणूक रणधुमाळीत आणखी एक धक्का मानला जात आहे.
लातूरमध्ये भाजपाची ताकद वाढली :
लातूर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी माजी आमदार दिनकरराव माने यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख संजय उजळबे, तालुका समन्वयक प्रदीप रणखांब आणि उपतालुका समन्वयक महादेव साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले.
या पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Uddhav Thackeray | शिवसेना का सोडली? माने यांनी सांगितलं कारण :
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिनकरराव माने (Dinkarrao Mane) म्हणाले की, “विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी आम्ही मोठे प्रयत्न केले. जनतेने मला दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिलं. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे संघटना कमकुवत होत गेली.”
ते पुढे म्हणाले, “शिवसैनिकांची कामं वेळेवर होत नाहीत, सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी काम करण्याच्या उद्देशाने मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे.” त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटातील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा समोर आला आहे.






