SBI Interest Rate Cut | देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) कोट्यवधी ग्राहकांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. बँकेने त्यांच्या अल्प आणि दीर्घ मुदतीच्या सर्व मुदत ठेवी (Fixed Deposits – FD) आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळे आगामी काळात ग्राहकांना कमी व्याज मिळणार असून, या निर्णयाचा देशातील कोट्यवधी लोकांना मोठा फटका बसणार आहे. हे नवीन व्याजदर १५ जून २०२५ पासून लागू झाले आहेत.
व्याजदरात कपात :
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व एफडी योजनांवरील व्याजदर २५ बेसिस पॉईंट्सने (०.२५%) आणि बचत खात्यांवरील व्याजदर ५० बेसिस पॉईंट्सने (०.५०%) कमी केले आहेत. या कपातीनंतर आता यापुढे ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या बचतीवरील परतावा कमी होईल.
काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांनी त्यांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) यांसारख्या खासगी क्षेत्रातील बँकांनी व्याजदर कमी केले होते. त्यानंतर आता एसबीआयनेही व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे इतर बँकाही हेच पाऊल उचलू शकतात.
SBI Interest Rate Cut | एसबीआयचे एफडीवरील नवीन व्याजदर :
एसबीआयने सर्व नियमित एफडी कालावधींवरील व्याजदर २५ बेसिस पॉईंट्सने कमी केला आहे. या कपातीनंतर आता बँक सामान्य नागरिकांना एफडीवर कमीत कमी ३.०५% आणि जास्तीत जास्त ६.४५% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक कमीत कमी ३.५५% आणि जास्तीत जास्त ७.०५% व्याज देत आहे, जे यापूर्वीपेक्षा कमी आहे. हे नवीन दर १५ जून २०२५ पासून लागू झाले आहेत, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.
स्टेट बँकेने बचत खात्याचा व्याजदर वार्षिक २.५% केला आहे. हा नवीन दर १५ जून २०२५ पासून लागू आहे. यापूर्वी बँक १० कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर २.७% आणि १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ३% व्याज देत होती, मात्र आता त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना बचत खात्यावरील परताव्यात घट होणार आहे.






