बीड | सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या करताना झालेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आले. या फोटोने संपूर्ण महाराष्ट्रात धक्का दिला. आरोपींनी क्रूरपणे मारहाण करत असताना आनंद साजरा केला, कपडे काढून लघूशंका करत वेदनांनी छळले आणि सेल्फी घेतले. हे फोटो आणि सीसीटीव्ही पुरावे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
जरी हे पुरावे ८५ दिवसांनंतर समोर आले असले तरी, गुन्हा घडल्याच्या सातव्या दिवशी पोलिसांनी हे व्हिडीओ तपासात घेतले होते. महेश केदारच्या मोबाईलमधील व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पोलिसांनी चार्जशीटमध्ये समाविष्ट केले आहेत.
महत्त्वाचे पुरावे आणि सीआयडीचा तपास
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने सापडलेले १९ महत्त्वाचे पुरावे उघड झाले आहेत. या पुराव्यातील एक मोठा भाग एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीत सापडले. सुदर्शन घुलेच्या स्कॉर्पियो गाडीचा तपास करत पोलिसांनी त्यात पाच मोबाईल जप्त केले. यातील महेश केदार आणि सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमधून व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. या व्हिडीओंनी आरोपींची अपराधाची शहानिशा केली आहे. पोलिसांनी ७ दिवसांनंतर मोबाईल जप्त केले असून, ते मोठा पुरावा ठरले आहेत.
आरोपींनी मारहाण करत असताना मोकारपंथी या ग्रुपमध्ये व्हिडीओ कॉल केला. त्यात ग्रुपमधील काही लोकांनी स्क्रीनशॉट्स घेतले. हे फोटो आता मोठे पुरावे ठरले आहेत. पोलिसांना एकूण ८ मिनिटांचा व्हिडीओ मिळाल्याचे समोर आले आहे, तसेच १० ते १२ व्हिडीओ फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपासले गेले आहेत. कराडसह सर्व आरोपींच्या मोबाईल्सची तपासणी सुरू आहे. एकच मोबाईल, विष्णू चाटेचा मोबाईल, अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
वाल्मिक कराडवर मकोका कसा लागला?
मारहाण करत असताना आरोपींच्या मोबाईलमधून एकूण २५ व्हिडीओ घेण्यात आले आहेत. तपासाच्या सुरुवातीला व्हिडीओ मिळत नसल्यामुळे अडचणी आल्या. आरोपींना न्यायालयात हजर करताना, विशेषत: वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आले होते. यावर न्यायालयाने विचारणा केली होती. व्हिडीओच्या उशीराने बाहेर येण्याबद्दल विचारले असता, तपास दलाने त्याचे उत्तर दिले. व्हिडीओ सार्वजनिक होण्यास उशीर का झाला? तपासाच्या भागातून हे व्हिडीओ सार्वजनिक कसे झाले? असा सवाल संतप्त महाराष्ट्र विचारत आहे.






