Municipal Election 2025 | राज्यातील महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पक्षातील दिग्गज नेते, केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार, आमदार तसेच युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Mumbai Municipal Election)
निवडणूक प्रचारात आघाडी मिळवण्यासाठी शिंदे गटाने अनुभवी आणि प्रभावी नेत्यांवर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतः प्रचाराची धुरा सांभाळणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट महापालिका निवडणुकीत ताकदीनिशी उतरल्याचं स्पष्ट होत आहे.
शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश :
शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, दीपक केसरकर, योगेश कदम आणि आशिष जयस्वाल यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे तसेच माजी खासदार राहुल शेवाळे यांनाही स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
या सर्व नेत्यांच्या माध्यमातून राज्यातील विविध महापालिकांमध्ये प्रभावी प्रचार करण्याचा शिंदे गटाचा मानस आहे. स्थानिक मुद्दे, विकासकामे आणि सत्ताकाळातील निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यावर प्रचारात भर दिला जाणार आहे.
Municipal Election 2025 | युतीचे राजकारण आणि मुंबई महापालिकेचं आव्हान :
महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) गटासोबतही युती होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी ही युती होणार नाही, तिथे राजकीय समीकरणं वेगळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती जाहीर झाल्यामुळे शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील राजकारण अधिक चुरशीचं झालं असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला रणनीती आखताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत जागावाटप आणि प्रचाराची दिशा स्पष्ट होणार असून, महापालिका निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.






