Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत असतानाच सोशल मीडियावरील एका गंभीर प्रकारामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर करत ऑनलाइन शिवीगाळ आणि अपमानास्पद कमेंट्सबाबत संताप व्यक्त केला. या प्रकरणात काही जण स्वत:ला मराठी आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे समर्थक म्हणवत असल्याचा दावा तिने केला आहे.
सोशल मीडियावरील शिवीगाळीवर श्वेताचा संताप :
गुरुवारी श्वेता तिवारीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून महिलांना सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीवर भाष्य केलं. एखादी महिला कोणत्याही वयाची, कोणत्याही क्षेत्रात काम करणारी किंवा कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेली असली, तरी तिच्याविरोधात सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ भाषा वापरली जाते, यावर तिने नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे अशी भाषा वापरणारे लोक केवळ अशिक्षित किंवा असामाजिक प्रवृत्तीचे असतात, असंही नाही, असं श्वेताने म्हटलं. अनेकदा हे लोक सुशिक्षित असतात आणि समाजात प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख असते.
आपल्या पोस्टमध्ये श्वेताने या मानसिकतेवरच प्रश्न उपस्थित केला. ज्या पुरुषांच्या घरात आई, पत्नी, मुलगी आणि बहीण अशा महिला असतात, तेच पुरुष दुसऱ्या महिलेबद्दल सोशल मीडियावर अत्यंत अपमानजनक शब्द वापरताना अजिबात संकोच करत नाहीत, याचं तिला आश्चर्य वाटत असल्याचं तिने सांगितलं. यासोबतच तिने अश्लील आणि आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या काही युजर्सच्या प्रोफाइलचे स्क्रीनशॉटही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले.
Shweta Tiwari | ‘मराठी माणूस’ असण्याचा अर्थ हाच का? :
या प्रकाराचा संबंध स्वत:ला मराठी आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचे समर्थक म्हणवणाऱ्या काही व्यक्तींशी असल्याचं श्वेताने आपल्या पुढील पोस्टमध्ये नमूद केलं. दुसऱ्या महिलेशी अशा पद्धतीने वागल्यानंतर संबंधित पुरुष आपल्या कुटुंबातील महिलांसमोर कसा उभा राहतो, असा सवालही तिने केला. हा मुद्दा आपल्यासाठी वैयक्तिक असल्याचं सांगताना श्वेताने महाराष्ट्राशी असलेलं आपलं नातंही स्पष्ट केलं.
श्वेताच्या म्हणण्यानुसार, तिने आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात घालवलं असून तिचे वडील मुंबईत वाढले आहेत. लहानपणापासूनच तिने ‘मराठी माणूस’ या ओळखीशी जोडलेला अभिमान आणि प्रतिष्ठा पाहिली आहे. मराठी संस्कृती महिलांचा सन्मान, त्यांचं सामर्थ्य आणि त्यांच्या प्रतिष्ठेला महत्त्व देते, असा तिचा विश्वास होता. त्यामुळे स्वत:ला अभिमानाने मराठी म्हणवणारे लोक महिलांच्या सोशल मीडिया डीएममध्ये जाऊन शिवीगाळ करत असतील, तर ‘मराठी माणूस असण्याचा अर्थ आता हाच झाला आहे का?’ असा थेट प्रश्न तिने उपस्थित केला.
याच पार्श्वभूमीवर श्वेताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेही थेट उत्तर मागितलं आहे. स्वत:ला त्यांचे समर्थक म्हणवणाऱ्या व्यक्तींचं असं वर्तन त्यांना मान्य आहे का, असा सवाल तिने केला. केवळ मराठी भाषा बोलणं, स्वत:ला मराठी माणूस म्हणवून घेणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचं सांगणं पुरेसं नाही, तर महिलांचा सन्मान करणंही तितकंच आवश्यक असल्याचं श्वेताने स्पष्ट केलं आहे.






