Weather Alert | राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढल्यानंतर आता अचानक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी थंडीचा अलर्ट जारी केला असून पुढील 48 तास तापमानात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्यामुळे त्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्राकडे सरकत आहे. परिणामी सकाळी आणि रात्री गारठा तीव्रपणे जाणवतोय. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर वातावरण कोरडे होऊन आता राज्यात शितलहरीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण सुरू आहे. (Maharashtra Cold Wave)
राज्यात कडाक्याची थंडी; IMD चा मोठा इशारा :
धुळे (Dhule) जिल्ह्यात तापमानाचा पारा थेट 6.1 अंश सेल्सिअसवर घसरला असून सलग दोन दिवसांपासून तापमानात मोठी घसरण कायम आहे. इतक्या कमी तापमानामुळे पालकांकडून शाळेच्या वेळांत बदल करण्याची मागणीही होत आहे. हवामान विभागाने धुळे, पुणे (Pune), जळगाव, नाशिक (Nashik), मालेगाव यांसह राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस थंडी वाढतच राहील, असं स्पष्ट केलं आहे.
तसंच, परभणी आणि निफाडमध्ये तापमान 7 अंशांपर्यंत खाली गेले आहे. आहिल्यानगर, पुणे, नाशिक या भागांत पारा 10 अंशांखाली नोंदवला जात असून नागरिकांना सकाळी घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात 3 ते 9 अंशांची मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याने गारठा आणखी वाढणार आहे.
Weather Alert | मुंबईचाही पारा खाली; पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे :
मुंबई (Mumbai) आणि उपनगरांमध्येही थंडी वाढू लागली आहे. आज मुंबईत कमाल तापमान 34 अंश आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके नोंदले जाणार आहे. थंडीच्या दिशेने जाणाऱ्या हवामानामुळे सकाळी गारवा आणि संध्याकाळी वाढलेला गारठा स्पष्ट जाणवत आहे. (Maharashtra Weather Alert)
तसेच उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये तापमान झपाट्याने घसरत असल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. हवामान विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की महाराष्ट्रात हिमलाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुढील 48 तास तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






