राजकीय भूकंप! ‘तो’ बडा नेता अजितदादांच्या गळाला; थेट पक्षप्रवेश

On: December 11, 2025 9:34 AM
Maharashtra Politics
---Advertisement---

Maharashtra Politics | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत अनेक महानगर पालिकांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Aiit Pawar) यांनी लातूरमध्ये मोठी राजकीय चाल खेळली आहे. त्यांनी एका बड्या नेत्याला आपल्या पक्षात जागा देत निवडणुकीपूर्वीच समीकरणं बदलून टाकली आहेत.

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. निवडणुकीत स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असताना अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय राजकीय घडामोडींना मोठा कलाटणी देणारा आहे. हा नेता कोण? आणि यामुळे स्थानिक राजकारणात काय बदल होणार? या प्रश्नांची चर्चा राज्यभर रंगली आहे.

चंद्रकांत बिराजदार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश :

लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार (Chandrakant Birajdar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एक्सवरून ट्वीट करत अजित पवारांनी स्वतः ही माहिती दिली. पवार म्हणाले की, लातूर येथील माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांसह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून पक्ष परिवारात त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा संकल्प नवीन सहकाऱ्यांनी केला असल्याची नोंदही त्यांनी केली.

यापूर्वी चंद्रकांत बिराजदार भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेस नेते विक्रांत गोजमगुंडे महापौर झाल्यावेळी काँग्रेसच्या पाठिंब्याने बिराजदार उपमहापौर बनले. मात्र काँग्रेसच्या मदतीनंतरही ते भाजपमध्ये सक्रीय होते. काही दिवसांपूर्वीच विक्रांत गोजमगुंडे राष्ट्रवादीत दाखल झाले होते आणि त्यांच्या या निर्णयानंतर बिराजदारांनीही राष्ट्रवादीची वाट धरली.

Maharashtra Politics | गोजमगुंडे-बिराजदार जोडी पुन्हा एकत्र :

लातूरमधील महत्त्वाची जोडी म्हणून ओळखली जाणारी विक्रांत गोजमगुंडे (Vikrant Gojmagunde) आणि चंद्रकांत बिराजदार (Chandrakant Birajdar) ही जोडी आता पुन्हा एकत्र आली आहे. महापौरपदाच्या काळात गोजमगुंडे यांनी केलेल्या कामामुळे त्यांची मजबूत ओळख निर्माण झाली होती. आता दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्याने पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा बळकटीचा आधार मिळाला आहे.

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत गोजमगुंडे व बिराजदार जोडीमुळे मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. शहर विकास, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक पातळीवरील प्रलंबित मुद्दे सोडवण्यासाठी दोन्ही नेते आता एकत्रितपणे काम करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणातील अनेक समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

News Title: Senior Leader Joins Ajit Pawar’s NCP, Changing Local Election Equations in Latur

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now