महाराष्ट्रातील ट्रेडिंग गुरूवर कारवाई! अवधूत साठेंच्या कार्यालयावर सेबीची छापेमारी

On: August 23, 2025 11:36 AM
Avadhoot Sathe SEBI Raid
---Advertisement---

Avadhoot Sathe SEBI Raid | महाराष्ट्रात शेअर बाजार प्रशिक्षणाच्या क्षेत्रात नावाजलेले ट्रेडिंग गुरू म्हणून ओळखले जाणारे अवधूत साठे सध्या सेबीच्या (SEBI) रडारवर आले आहेत. सेबीच्या अंमलबजावणी पथकाने 20 ऑगस्ट रोजी कर्जत (Karjat) येथील त्यांच्या अकादमीवर छापेमारी केली. चुकीच्या सल्ल्यांमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे शेअर मार्केटमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांवरही कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. (Avadhoot Sathe SEBI Raid)

या छापेमारीत सेबीने डिजिटल उपकरणे, दस्तऐवज आणि ट्रेडिंगशी संबंधित महत्त्वाची माहिती जप्त केली आहे. ही सर्व माहिती आता फॉरेन्सिक तपासणीसाठी वापरली जाणार आहे. साठे यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून पुढील चौकशीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अवधूत साठे कोण आहेत? :

अवधूत साठे 1991 पासून बाजारपेठेत सक्रिय आहेत. ते मूळचे दादरमधील चाळीत वाढले आणि पुढे मुलुंडला स्थायिक झाले. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजमधून सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअरला सुरुवात केली. काही काळ त्यांनी अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियात नोकरी केली.

2008 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन फायनान्शियल सल्लागार आणि ट्रेनर म्हणून करिअर सुरू केले. त्यांनी शेअर बाजारावरील प्रशिक्षणासाठी अकादमी स्थापन केली. त्यांच्या YouTube चॅनलला आज 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. येथे ते गुंतवणूक धोरणे, चार्ट विश्लेषण आणि ट्रेडिंग टिप्स देत असतात.

Avadhoot Sathe SEBI Raid | वाद आणि तक्रारींचा भडका :

साठे यांच्या प्रशिक्षणामुळे अनेकांनी ट्रेडिंग सुरू केले, परंतु काही गुंतवणूकदारांनी त्यांच्या सल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या जाहिरातींमध्ये अवास्तव नफ्याच्या हमी दिल्याचा देखील आरोप आहे. याच कारणामुळे सेबीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

या कारवाईनंतर त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांच्या पाठीशी उभं राहत त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त असल्याचे सांगितले, तर काहींनी त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सेबीची कठोर भूमिका :

सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी नुकत्याच झालेल्या फिक्कीच्या कार्यक्रमात सांगितले की, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. गुंतवणूकदारांनी केवळ सेबी-नोंदणीकृत सल्लागारांचा सल्ला घ्यावा आणि अवास्तव नफ्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले. (Avadhoot Sathe SEBI Raid)

अवधूत साठे यांच्या विरोधातील तपासाचे निकाल काय लागतात, याकडे गुंतवणूकदार आणि प्रशिक्षण क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई भविष्यात इतर अशा प्रशिक्षण संस्थांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

News Title : SEBI Action on Maharashtra’s Trading Guru Avadhoot Sathe | Who is Avadhoot Sathe?”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now