Satara Doctor Death | फलटण (Phaltan) येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी तपासाचा आढावा घेतला. आत्महत्येच्या रात्री नेमके काय घडले, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. फोटो काढण्यावरून झालेल्या वादातून ही दुर्दैवी घटना घडल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या रात्री फोटोवरून वादाची ठिणगी :
रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) या आरोपी प्रशांत बनकरच्या (Prashant Bankar) घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. फोटो व्यवस्थित येत नसल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले.
भांडणानंतर डॉ. मुंडे रागाने जवळच्या मंदिराजवळ जाऊन बसल्या. प्रशांतच्या वडिलांनी त्यांची समजूत काढून घरी आणले. मात्र, त्यानंतर डॉ. मुंडे थेट लॉजवर गेल्या. लॉजवर गेल्यानंतरही त्यांचे प्रशांतसोबत बोलणे सुरू होते. त्यांनी ‘मी आत्महत्या करेन’ असे मेसेज केले आणि तसे फोटोही पाठवले. मात्र, प्रशांतचा मोबाईल नंतर बंद झाला. प्रशांतने, ‘तू यापूर्वीही अशा धमक्या दिल्या आहेत,’ असे उत्तर दिल्याचे संभाषणावरून स्पष्ट होत आहे, असे चाकणकर म्हणाल्या.
Satara Doctor Death | आरोपी बदनेने लपवला मोबाईल, तपासात डिजिटल पुरावे महत्त्वपूर्ण :
या प्रकरणातील मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) याने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा मोबाईल या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. बदने मात्र मोबाईल कुठे आहे, याबाबत माहिती लपवत आहे.
दोन्ही आरोपी मृत डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. प्रशांत बनकर हा आत्महत्येपूर्वीही डॉक्टरच्या संपर्कात असल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रशांत बनकरला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. बदनेचा मोबाईल सापडल्यानंतर आणि दोन्ही आरोपींच्या चौकशीतून आणखी सत्य समोर येण्याची शक्यता आहे.






