ठाकरेंना मोठा झटका !’त्या’ 6 खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी समोर

On: August 10, 2026 4:55 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने अध्यक्षांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

सहा खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती नाही :

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभेतील नऊ खासदारांपैकी तब्बल सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गटाची लोकसभेतील संख्या वाढली असून, त्यांच्या खासदारांचा आकडा आता 13 वर पोहोचला आहे.

या सहा खासदारांच्या गटाला शिवसेना शिंदे गटात विलीन होण्यास लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली होती. अध्यक्षांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाने त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेत थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. लोकसभा अध्यक्षांचा विलिनीकरणासंदर्भातील निर्णय चुकीचा असल्याचा दावा करत त्याला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्ट या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

Uddhav Thackeray | लोकसभा अध्यक्षांसह खासदारांना दोन आठवड्यांची मुदत :

ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला सध्या न्यायालयीन स्थगिती मिळालेली नाही. हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना या घडामोडीमुळे दिलासा मिळाला आहे.

मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची पुढील प्रक्रिया सुरू ठेवली आहे. लोकसभा अध्यक्ष तसेच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांनी या प्रकरणी दोन आठवड्यांच्या आत आपले उत्तर दाखल करावे, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थगिती नाकारण्यात आली असली तरी प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप झालेला नाही. आता लोकसभा अध्यक्ष आणि संबंधित सहा खासदार न्यायालयासमोर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सहा खासदारांच्या बंडामुळे ठाकरे गटाची लोकसभेतील ताकद कमी झाली असून शिंदे गटाचे संख्याबळ 13 खासदारांपर्यंत वाढलं आहे.

News title : Supreme Court Relief for Shinde Sena

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now