झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळलं; पोलिसांचा विद्यार्थ्यांवर तुफान लाठीचार्ज

On: August 10, 2026 2:50 PM
Jharkhand Student Protest (1) (1)
---Advertisement---

Jharkhand Student Protest | झारखंडमधील रांची (Ranchi) येथे परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झालं. गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा केला.

विधानभवनाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई :

झारखंडमध्ये (Jharkhand) परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन मागील 17 दिवसांपासून सुरू आहे. सोमवारी विद्यार्थ्यांनी विधानभवन मार्चची हाक दिल्याने प्रशासनाने सुरक्षेची मोठी तयारी केली होती. विधानभवन परिसरात सुमारे 1500 जवान तैनात करण्यात आले होते. आंदोलनातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात होती. मात्र एवढा बंदोबस्त असूनही आंदोलक विद्यार्थ्यांनी बॅरिकेट्स हटवून विधानभवनाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थी अधिक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यापूर्वी पोलिसांकडून पाण्याचा फवारा मारून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही विद्यार्थी मागे हटले नाहीत. बॅरिकेट्स आणि पाण्याचा मारा या दोन्ही कारवायांनंतर आंदोलकांनी दुसऱ्या मार्गाने विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. या घटनांमुळे दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनासारखीच परिस्थिती रांचीमध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Jharkhand Student Protest | सरकारच्या दाव्यावर विद्यार्थ्यांचा आक्षेप

रांचीतील या आंदोलनाचं नेतृत्व देवेंद्र नाथ महतो (Devendra Nath Mahto) करत आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या 750 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 163 लागू करण्यात आलं आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली असली, तरी विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलनामुळे झारखंडमधील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. मात्र आंदोलकांनी सरकारचा हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. त्यामुळे मागण्यांवरून सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष कायम असल्याचं दिसत आहे. एका विद्यार्थी आंदोलकाने पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप करत लाठीचार्ज अत्यंत अमानुष पद्धतीने झाल्याचं म्हटलं. लाठीचार्ज करताना कमरेखाली मारण्याची पद्धत असते, मात्र आंदोलकांच्या डोक्यावर, हातावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवरही मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याने केला. सरकारकडून दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचाही आरोप या विद्यार्थ्याने केला आहे.

News title : Jharkhand Student Protest Turns Violent

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now