आता नगरसेवकांना आयपॅड मिळणार; ‘या’ महापालिकेचा डिजिटल कारभार होणार

On: August 10, 2026 2:08 PM
BMC
---Advertisement---

BMC | मुंबई महापालिकेचा कारभार अधिक आधुनिक आणि कागदविरहित करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या 237 नगरसेवकांसह काही स्थायी समिती कर्मचाऱ्यांना आयपॅड देण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात असून, साधारण महिनाभरात ती पूर्ण करून संबंधितांना आयपॅड उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

सभागृहातील कागदपत्रे आता डिजिटल स्वरूपात :

महापालिकेच्या सभागृहाच्या तसेच विविध समित्यांच्या बैठकीसाठी लागणाऱ्या विषयपत्रिका, प्रस्ताव, अहवाल आणि इतर संबंधित कागदपत्रांचे डिजिटल माध्यमातून वितरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. आयपॅडच्या माध्यमातून नगरसेवकांना ही सर्व माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे बैठकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांच्या प्रती काढण्याची गरज कमी होईल. त्यातून कागदाचा वापर आणि छपाईवर होणारा खर्चही घटण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.

मात्र, डिजिटल पद्धतीचा अवलंब केला म्हणून कागदी कागदपत्रे तात्काळ पूर्णपणे बंद केली जाणार नाहीत. एखाद्या नगरसेवकाला डिजिटल स्वरूपातील माहिती पाहताना किंवा वापरताना अडचणी आल्यास त्याला कागदी प्रत देण्याची व्यवस्था कायम ठेवली जाणार आहे. सभागृह नेते गणेश खणकर (Ganesh Khankar) यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेत डिजिटल माध्यमाला प्राधान्य असले तरी गरजेनुसार पारंपरिक पद्धतीचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे.

BMC | जुन्या लॅपटॉपपासून वाहन खरेदीच्या वादापर्यंत :

यापूर्वी 2012 मध्ये शिवसेना सत्तेत असताना नगरसेवकांना लॅपटॉप देण्यात आले होते. त्यावेळी संबंधितांना या उपकरणांचा वापर करण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र, अनेक नगरसेवकांनी लॅपटॉपचा अपेक्षित वापर केला नसल्याचे समोर आले होते.

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हे लॅपटॉप परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही बहुतांश नगरसेवकांनी ते परत केले नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता आयपॅडचे वाटप झाल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष वापर कितपत होतो, याकडे प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

News title : BMC Plans iPads for Corporators

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now