Santosh Deshmukh | बीड (Beed) येथील विशेष मकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी 32 मिनिटे सखोल युक्तीवाद सादर करत या खुनामागील संपूर्ण घडामोडी न्यायालयात मांडल्या.
सुदर्शन घुलेची धमकी-
उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे तिघे मस्साजोग येथील आवाजा कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि सुरक्षा रक्षकास शिवीगाळ करत मारहाण केली. सुदर्शन घुले याने कंपनीकडून दोन कोटी रुपयांची मागणी करत, पैसे न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली. वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि गावातील काहीजण घटनास्थळी आले. त्यावेळी सुदर्शनने संतोष देशमुख यांनाही धमकावले.
या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींना ताब्यात घेतले, पण अटक दाखवण्यात विलंब झाला. प्रत्यक्ष अटक 7 डिसेंबरच्या पहाटे दाखवण्यात आली. यामुळे पोलिसांनी प्रकरण गंभीरपणे घेतले नाही, असा आरोप उज्ज्वल निकम यांनी केला.
हॉटेलमध्ये बैठक आणि हत्या करण्याचा कट-
7 डिसेंबरच्या रात्री सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन करून घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यावर कराडने, “अडथळा आणणाऱ्यांना संपवा” असा संदेश दिल्याचं कबूल केल्याचे निकम यांनी सांगितले. या संवादाचे सीबीआर आणि पुरावे कोर्टात सादर करण्यात आले आहेत.
8 डिसेंबरच्या रात्री सुमारे 9 वाजता केज मांजरसुंबा रोडवरील नांदूर फाट्याजवळ असलेल्या तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि एक गोपनीय साक्षीदार एकत्र भेटले. या बैठकीत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्येचा कट रचण्यात आला.
अपहरणानंतर निर्घृण हत्या-
उज्ज्वल निकम यांच्या युक्तीवादानुसार, 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता संतोष देशमुख यांचे उमरी फाटा टोलनाक्याजवळून अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशनसह अन्य अनेक महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये गुन्ह्याचं ठोस नियोजन दिसून येत असल्यामुळे ही केस चार्ज फ्रेमसाठी योग्य स्थितीत असल्याचं निकम यांनी स्पष्ट केलं.






