Santosh Deshmukh Murder | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या (Murder) प्रकरणात अटकेत असलेला प्रमुख आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने सीआयडीला (CID) दिलेल्या कबुलीजबाबात (Confession Statement) हत्येदरम्यानच्या अमानुष अत्याचारांचा धक्कादायक तपशील उघड केला आहे. या जबाबात त्याने, सहआरोपी प्रतीक घुले (Prateek Ghule) याने संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका केली आणि त्यांच्या छातीवर उडी मारल्याचे म्हटले आहे. तसेच, मारहाण सुरू असताना विष्णू चाटे (Vishnu Chate) याच्याशी दोन वेळा बोलणे झाल्याचेही त्याने मान्य केले आहे.
अमानुष मारहाण आणि विष्णू चाटेशी संपर्क
सुदर्शन घुले याने सीआयडीला दिलेल्या जबाबातील तपशील आता समोर आला आहे. त्यानुसार, ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना टाकळी शिवारात (Takli Shivar) नेल्यानंतर आरोपींनी त्यांना तब्बल दोन तास अमानुष मारहाण केली. यावेळी क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप आणि लाकडी काठी यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आला. याच मारहाणीदरम्यान प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली आणि नंतर पळत येऊन त्यांच्या छातीवर जोरात उडी मारली, ज्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली, असा धक्कादायक खुलासा सुदर्शन घुलेने केला आहे.
खंडणी (Ransom) न दिल्याने वाल्मिक कराडने (Walmik Karad) ‘आडवे येणाऱ्याला आडवे करा’ असा निरोप दिला होता आणि त्याप्रमाणेच आपण सरपंचाला मारहाण केली, असेही सुदर्शनने म्हटले आहे. मारहाण सुरू असताना, जयराम चाटेच्या (Jayram Chate) मोबाईलवरून आपण विष्णू चाटे याच्याशी दोन वेळा बोलल्याचेही त्याने कबूल केले आहे. दुसरीकडे, हाच विष्णू चाटे त्यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना ‘तुमचा भाऊ परत येईल’ असे सांगून थांबवून ठेवत होता, असेही जबाबात नमूद आहे.
अपहरणाचा घटनाक्रम आणि तुरुंगातील घडामोडी
सुदर्शन घुलेने अपहरणाच्या कटाचा आणि घटनेचा क्रमही सांगितला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle), महेश केदार (Mahesh Kedar), कृष्णा आंधळे (Krishna Andhale) आणि जयराम चाटे यांनी एकत्र येऊन अपहरणाचा कट रचला. दोन गाड्या (एक कृष्णाने किरायाने आणलेली आणि दुसरी सुदर्शनची काळी जीप) वापरून उमरी टोलनाक्याजवळ (Umri Toll Naka) दुपारी ३ वाजता देशमुख यांच्या गाडीला अडवण्यात आले. दगडाने काच फोडून, गॅस पाईपने मारहाण करत आणि देशमुख यांच्या मावसभावाला कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. टाकळी शिवारात दोन तास मारहाण केल्यानंतर देशमुख निपचित पडले. ते मयत झाल्याचा संशय आल्यावर जयराम चाटेने त्यांना कपडे घातले. सर्व आरोपी तुरीच्या शेतात अंधार होईपर्यंत लपून बसले आणि अंधार पडल्यावर मृतदेह दैठणा फाटा (Daithana Phata) येथे टाकून वाशीच्या (Vashi) दिशेने पसार झाले.
दरम्यान, सोमवारी बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने मंगळवारी सकाळी मकोकातील (MCOCA) आठवले गँगला (Athawale Gang), ज्यात अक्षय आठवले (Akshay Athawale) समाविष्ट आहे, नाशिक (Nashik) कारागृहात हलवले आहे. यापूर्वी सोमवारी सायंकाळी महादेव गित्ते (Mahadev Gite) याच्यासह त्याच्या साथीदारांना संभाजीनगरच्या हर्सूल (Harsul) कारागृहात पाठवण्यात आले होते. सुरक्षेसाठी हे केले जात असल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी नेमका वाद कोणात झाला होता, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण मारहाणीचा गुन्हा सुधीर सोनवणे (Sudhir Sonawane) आणि राजेश वाघमोडे (Rajesh Waghmode) यांच्यावर दाखल झाला आहे. दुसरीकडे, बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्ते (Baban Gite) अजूनही पोलिसांना सापडत नसला तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे वृत्त आहे.
Title : Santosh Deshmukh Murder Ghule Confession Brutality






