Santosh Deshmukh Murder | बीड (Beed) जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, अटकेत असलेल्या वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीने अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीने पाइपला करदोड्याने मूठ तयार करून तसेच लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून देशमुख यांना बेदम मारहाण केली. तपासादरम्यान, सीआयडीने (CID) कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे गोळा केले आहेत, तसेच १८४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात पाच गोपनीय साक्षीदारांचाही समावेश आहे.
मारहाण करताना ‘एन्जॉय’ केला
देशमुख यांना कपडे काढून, निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली. हे करताना आरोपी मोठमोठ्याने हसत होते आणि घटनेचा आनंद साजरा करीत होते, असा दावा सीआयडीने आरोपपत्रात केला आहे. आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओदेखील बनवला, जो सीआयडीच्या हाती लागला आहे.
ऑडिओ, व्हिडिओ क्लिपही जप्त
कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून खंडणी मागितली होती. त्याचे कॉल रेकॉर्डिंग सीआयडीने जप्त केले आहे. काही व्हिडिओदेखील सीआयडीच्या हाती लागले आहेत. चाटेच्या कार्यालयातील बैठक, नांदूर फाटा येथे हत्येचा कट आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केल्याचे सीआयडीने न्यायालयाला सांगितले.
काय आढळले पुरावे?
एक गॅसचा पाइप ज्याची लांबी ४१ इंच आहे. एका बाजूला गोलाकार केलेली मूठ असून, त्यावर काळ्या करदोड्याने (Karodyane) मूठ तयार केली आहे. याच पाइपवर लालसर रक्ताचा डाग आढळला.
एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मूठ असलेला पाइप, ज्यात लोखंडी तारेचे ५ क्लच वायर बसवलेले आहेत. त्याची लांबी ४१.५ इंच आहे.
अपहरण केलेल्या वाहनातील चालक सीट, मॅटिंग व इतर ठिकाणी रक्ताचे डाग.
सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले.
प्लॅस्टिकचे काळ्या काचांचे, काळ्या रंगाचे दोन गॉगल्स.
काळ्या व पांढऱ्या रंगाचा गोल गळा असलेले टी शर्ट.
एक काळ्या रंगाची १० नंबर साइज असलेली स्लिपर चप्पल.
एक काळ्या रंगाचे लेदर जॅकेट.
एक काळ्या रंगाचे घड्याळ, काळ्या रंगाचा बेल्ट.
आवाजाचा नमुना (अहवाल अप्राप्त).
१२ मार्चला सुनावणी
हत्या प्रकरणात एकूण ९ आरोपी होते. यातील सिद्धार्थ सोनवणे याला पुराव्यांअभावी वगळले आहे. आता १२ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.
मंत्री मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा : रामदास आठवले
नाशिक (Nashik) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले की, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा खुनाशी थेट संबंध असल्याचे पुरावे नसले, तरी मुख्य आरोपी कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय होता. त्यामुळे, नीतिमत्तेच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंकडून राजीनामा घ्यायला हवा.
Title : Santosh Deshmukh murder Evidence of Karad Gangs Brutality 66 Evidences 184 Statements






