Santosh Deshmukh Murder | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे (Masajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी (Murder Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचण्यात आला होता, अशी साक्ष एका गोपनीय साक्षीदाराने दिली आहे. या साक्षीनुसार, आरोपी विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांनी हा कट रचला होता आणि ज्या बैठकीत हा प्लॅन झाला, त्या बैठकीला हा साक्षीदार स्वतः उपस्थित होता.
खोटा गुन्हा दाखल करण्याच्या कटाची ‘ती’ बैठक
धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) हे गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट होता, असे सांगत होते. आता गोपनीय साक्षीदाराच्या साक्षीने या दाव्याला पुष्टी मिळत असल्याचे दिसत आहे. साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील नांदूरफाटा (Nandurfata) येथील एका हॉटेलमध्ये विष्णू चाटे याच्या वाढदिवसानिमित्त जेवणाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. याच पार्टीत जेवण सुरू असताना विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात वाद झाला.
यावेळी विष्णू चाटे ६ डिसेंबर रोजी घडलेल्या एका घटनेवरून सुदर्शन घुलेला टोचून बोलला. “तुला वॉचमनला मारायची काय गरज होती? आम्ही कमवायचे व तुम्ही गमवायचे,” असे चाटे घुलेला म्हणाला. त्याने घुलेमुळे स्वतःची आणि इतरांचीही इज्जत गेल्याचे म्हटले (“तु तुझी इज्जत घातलीसच पण आमची देखील इज्जत घातलीस”). यावर संतापलेल्या सुदर्शन घुलेने, “आम्ही सरपंचाला (संतोष देशमुख) उद्या उचलून नेतो व त्याच्यावर ३७६ भादंविचा (IPC Section 376 – Rape) गुन्हा नोंदवतो,” असे उत्तर दिले. त्यावर विष्णू चाटेने, “तुला काय करायचे ते कर, नाहीतर गावाकडे चितर, पाखरं, ससे सांभाळायचे काम कर… पण केजला येऊ नको,” असे म्हटल्याचे साक्षीदाराने आपल्या जबाबात सांगितले आहे.
कळंबमधील महिलेचा मृत्यू आणि दमानियांचे आरोप
या कथित कटामध्ये एका महिलेचा वापर करून संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध असल्याचे भासवण्याचा प्रयत्न होता, असा आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी यापूर्वीच केला होता. याच पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब (Kalamb) येथे एका महिलेचा तिच्या घरात संशयास्पदरित्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. ही मृत महिला आणि देशमुखांविरोधात कट रचण्यासाठी वापरली जाणारी महिला एकच असल्याचा संशय आता बळावला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या महिलेची हत्याच (Murder) झाल्याची शंका व्यक्त केली आहे.
अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, या मृत महिलेची संतोष देशमुख प्रकरणात चौकशी झाली होती. त्यांनी ‘एक्स’ (X – पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या महिलेच्या मृत्यूची बातमी कळंब पोलिसांआधी बीड पोलिसांना कशी मिळाली? आणि मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन (Postmortem) करून घाईघाईत अंत्यसंस्कार का करण्यात आले? असे सवाल त्यांनी विचारले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा कटातील महत्त्वाचा दुवा नाहीसा करण्यासाठी या महिलेची हत्या केली असावी, असा संशय दमानिया आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा संबंध तपासून पाहत आहेत.
Title : Santosh Deshmukh Case False Rape Plot Witness






