Santosh Deshmukh | प्रकरणातील आरोपींच्या कबुली जबाबाने तपासाला नवी दिशा. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक, प्रतीक घुळे, याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने हत्या घडलेल्या स्थळाची ओळख पटवून दिली असून, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवली होती, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. या हत्यारांचा पंचनामा करून ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सुदर्शन घुलेची कबुली-
यापूर्वी, या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी, सुदर्शन घुळे, यानेही पोलीस कोठडीत असताना संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येची कबुली दिली होती. त्याचप्रमाणे, जयराम चाटे आणि महेश केदार या इतर आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या या कबुली जबाबांमुळे तपास अधिकाऱ्यांना प्रकरणाच्या उकल करण्यात महत्त्वाची मदत मिळाली आहे.
तपास अधिकाऱ्यांचे विधान-
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आरोपींच्या कबुली जबाबांमुळे आणि मिळालेल्या पुराव्यांमुळे आम्ही तपासात पुढे जात आहोत. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात ठोस आरोपपत्र दाखल केले जाईल.” पुढील तपासात या कबुली जबाबांचा आणि मिळालेल्या पुराव्यांचा सखोल अभ्यास करून न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे.
गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचे फॉरेन्सिक विश्लेषण-
फॉरेन्सिक तज्ज्ञांनी गुन्ह्यात (Santosh Deshmukh) वापरलेल्या कारचे सखोल परीक्षण केले आहे. या तपासणीत कारच्या आतील भागात रक्ताचे डाग, केस, आणि इतर जैविक पुरावे आढळले आहेत. तसेच, वाहनाच्या बाह्यभागावर संघर्षाच्या खुणा आणि स्क्रॅचेस देखील आढळले आहेत, ज्यामुळे हत्येच्या घटनेबाबत अधिक स्पष्टता येऊ शकते.






