Santosh Bangar | हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. एका शाळकरी ऑटोला दंड ठोठावल्याच्या प्रकरणावरून त्यांनी थेट संबंधित आरटीओ अधिकाऱ्याला फोन करून झापले. “दंड ठोकणार असाल तर मी आरटीओ ऑफिसला कुलूप लावेल,” असा दम त्यांनी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना समोर येताच जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, सरकारी अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचा दबाव टाकणे कितपत योग्य, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
शाळकरी ऑटोवर दंड, आमदारांचा संताप :
प्राप्त माहितीनुसार, शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटो रिक्षाला RTO अधिकाऱ्याने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठा दंड ठोठावला. त्यामुळे संबंधित चालक आमदार संतोष बांगर यांच्याकडे मदतीसाठी गेला. त्यानंतर संतोष बांगर यांनी थेट आरटीओ अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारला आणि “अशा पद्धतीने जर दंड ठोकणार असाल, तर RTO कार्यालयालाच कुलूप लावीन,” असा इशारा दिला.
या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बांगर यांचा अरोचक आणि थेट बोलण्याचा पद्धत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Santosh Bangar Viral Video)
Santosh Bangar | वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत :
संतोष बांगर हे शिंदे गटाचे शेवटचे आमदार मानले जातात. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभं असल्याचे त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. पण त्यानंतर रातोरात त्यांनी यु-टर्न घेतला आणि शिंदे गटात सामील झाले.
2019 आणि 2024 या दोनही निवडणुकांमध्ये त्यांनी कळमनुरी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या बांगर यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे – सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल घडवून आणणे, बदनामी करणे अशा स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर आहेत.(Santosh Bangar)
त्यांच्या या आक्रमक शैलीमुळे प्रशासनात भीतीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे काही नागरिक त्यांच्या ‘सामान्य माणसासाठी लढणाऱ्या’ इमेजमुळे त्यांचे समर्थन करत आहेत.






