Sanjay Shirsat | ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat Viral Video) यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ समोर आणत खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये शिरसाट यांची बेडरूम दिसत असून, त्याठिकाणी बेडवर एक मोठी बॅग ठेवलेली आहे. विशेष म्हणजे, ही बॅग ‘पैशांनी भरलेली’ आहे अशी चर्चा रंगली असताना, खुद्द शिरसाट यांनी यावर खुलासा करत ही बॅग कपड्यांची असल्याचं स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांसमोर हा व्हिडीओ सादर करत गंभीर आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “त्या व्हिडीओत मी माझ्या बेडरूममध्ये बनियनवर बसलेलो आहे, आणि बाजूला माझा लाडका कुत्राही आहे. माझ्या प्रवासातून मी नुकताच परत आलो होतो. त्या बॅगेत कपडेच होते, पैसे नव्हते,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
“बॅग कपड्यांची, पैशांची नाही!” :
व्हिडीओत दिसणाऱ्या बॅगेबाबत पत्रकारांनी थेट प्रश्न विचारल्यावर शिरसाट म्हणाले, “माझ्या घरात अलमाऱ्या नाहीत का, की मी इतके पैसे बॅगेत ठेवीन? एवढे पैसे असते, तर मी त्यांचं योग्यरित्या व्यवस्थापन केलं असतं.” त्यांनी हे आरोप फेटाळून लावत विरोधकांवर टीका केली की, “त्यांना फक्त पैसा दिसतो, वास्तव नाही.”
एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या विमानातून उतरतानाचे संदर्भ देत शिरसाट म्हणाले, “त्यांच्या सुरक्षारक्षकांकडे असलेल्या बॅगांबाबतही अशीच बिनबुडाची चर्चा केली गेली. विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत म्हणून अशी बिनधास्त आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली. (Sanjay Shirsat Viral Video)
Sanjay Shirsat | “राऊतांमुळेच शिवसेना फुटली” :
संजय शिरसाट यांनी या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर सडकून टीका करत म्हटलं की, “शिवसेना फुटण्यामागे राऊत यांचाच मोठा हात आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या धाडसाने निर्णय घेतला, त्यामुळेच आज महायुती मजबूत आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत आहोत.”
या व्हिडीओवरून सध्या राज्यात चर्चेचा धुरळा उडाला असला तरी शिरसाट यांनी केलेल्या स्पष्टोत्तरामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकतं. आता राऊत यांच्याकडून या स्पष्टीकरणावर काय प्रतिक्रिया येते आणि ही प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






