Sanjay Raut | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. मोदी आपला पंतप्रधानपदाचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, असे राऊत यांनी म्हटले आहे. 17 सप्टेंबरनंतर राजकीय परिस्थितीबाबत मोठा उलगडा होईल, असा दावा करत त्यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या पंतप्रधानपदाबाबतही स्पष्ट मत व्यक्त केले.
17 सप्टेंबरनंतर मोठ्या घडामोडींचा दावा :
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पुढील एका वर्षाच्या आत पंतप्रधानपद सोडावे लागू शकते, असे म्हटल्याचे राऊत यांना विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्यांनी हा दावा नवीन नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून नव्हे, तर अनेक महिन्यांपासून आपण मोदी कार्यकाळ पूर्ण करणार नसल्याचे सांगत असल्याचे त्यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पायउतार व्हावे लागू शकते. याबाबत 17 सप्टेंबरनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. 17 सप्टेंबर हा नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून, पंतप्रधान म्हणून हा त्यांचा शेवटचा वाढदिवस ठरेल, असेही राऊत यांनी सांगितले. मोदी पदावरून दूर झाल्यानंतर अमित शाह यांच्याकडे पंतप्रधानपद जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे म्हटले.
Sanjay Raut |मोदींच्या शेवटच्या भाषणाचा राऊतांचा दावा :
मोदींच्या वाढदिवसाचा संदर्भ देताना राऊत यांनी त्यांच्या समर्थकांवरही टीका केली. 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस असल्याने त्यांचे समर्थक मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करतील, मात्र पंतप्रधान म्हणून हा त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल, असा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून झालेले भाषणही पंतप्रधान म्हणून शेवटचे ठरल्याचे राऊत यांनी म्हटले.
आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती, राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका आणि समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आपण हे वक्तव्य करत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, देशातील परिस्थितीपुरतेच हे भाकीत मर्यादित नसून जागतिक पातळीवर दिसणाऱ्या राजकीय चित्राचाही आपण विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.






