Walmik Karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत असल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी “संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी,” ही मागणी केली. मात्र, त्यांनी स्वतःच्या राजीनाम्याबाबत कोणताही ठाम निर्णय न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले आहेत.
“वाल्मिक कराड निर्दोष सुटेल!” :
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यावर मौन बाळगल्याने आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्यावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या व्हेरिफाइड एक्स (Twitter) हँडलवरून त्यांनी थेट महायुती सरकारवर टीका करत लिहिलं की “अजित पवारांकडून अपेक्षा ठेवू नका. राजीनामा होत नसतो आणि वाल्मिक कराड ६ महिन्यांनी निर्दोष सुटेल. सगळे एकाच माळेचे मणी!”
यावर थांबत न राहता, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी पुढे लिहिले की “महादेव मुंडेचे मारेकरीही अटक होणार नाहीत. न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन पूर्णपणे बरबटलेलं आहे. सामान्य माणसाला कधीच न्याय मिळणार नाही. सत्ता आणि पैशासमोर सामान्य माणसांना झुकावं लागतं.”
Walmik Karad l क्षीरसागर यांचा इशारा! :
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा समाजावर आणि राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत संदीप क्षीरसागर यांनी राज्यात गृहयुद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली.
ते म्हणाले, “मोर्चे काढून काही उपयोग नाही. जर परिस्थिती अशीच राहिली, तर उद्या जाती-जातींमध्ये गुंडांच्या टोळ्या तयार होतील आणि परिस्थिती बिघडेल. राज्य गृहयुद्धाच्या दिशेनं जाऊ शकतं.”
महायुती सरकार पुढे काय भूमिका घेणार? :
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सरकारमधील तीनही प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
संदीप क्षीरसागर यांच्या टीकेनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत, त्यामुळे यावर लवकरच सरकारकडून स्पष्ट भूमिका घेतली जाईल, अशी शक्यता आहे.
News Title : sandip kshirsagar aginst on walmik karad and dhananjay munde






