सलमान खानने वांद्र्यातील आलिशान फ्लॅट तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींना विकला!

On: July 14, 2026 1:31 PM
Salman Khan House
---Advertisement---

Salman Khan House | बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे परिसरातील त्याचा एक लक्झरी फ्लॅट विकल्याची माहिती समोर आली आहे. 2015 मध्ये खरेदी केलेल्या या मालमत्तेची विक्री नुकतीच पूर्ण झाली असून या व्यवहारातून त्याला मोठा आर्थिक फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारातील स्टॅम्प ड्युटी आणि मालमत्तेच्या तपशीलामुळेही या विक्रीची चर्चा रंगली आहे.

3.50 कोटी रुपयांत फ्लॅटची विक्री :

9 जुलै रोजी वांद्रे येथील ‘शिव-आस्था हाइट्स’ इमारतीतील सलमान खानच्या 758 चौरस फुटांच्या फ्लॅटचा व्यवहार पूर्ण झाला. हा फ्लॅट त्याने 2015 मध्ये 2.88 कोटी रुपयांना खरेदी केला होता, तर आता सुमारे 3.50 कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. या मालमत्तेसोबत दोन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश असून नोंदणी कागदपत्रांनुसार प्रति चौरस फूट किंमत सुमारे 46 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती.

हा फ्लॅट मुनिरा अकबर अली दांडावाला, महदियाली अकबर अली दांडावाला आणि झेहरा यांनी खरेदी केला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार खरेदीदारांनी 21 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. मात्र, या व्यवहाराबाबत सलमान खान किंवा नव्या मालकांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Salman Khan House | ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सोडण्याच्या चर्चांना उधाण :

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मधील राहते घर सोडून नव्या निवासस्थानी जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच लॉरेन्स बिश्नोईकडून मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तो गॅलेक्सी अपार्टमेंटपासून काही अंतरावर समुद्रकिनाऱ्यालगत सहा मजली नवे घर उभारण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरी मिळाल्याचेही सांगितले जात असून संबंधित जमीन सलमा खान यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कामाच्या आघाडीवर पाहिले तर सलमान खान लवकरच अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘मातृभूमी’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच दाक्षिणात्य दिग्दर्शक वामशी पैदिपल्ली यांच्या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटातही तो प्रमुख भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट 2027 मध्ये ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

News Title: Salman Khan Sells Bandra Flat

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now