Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्याने अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जुलैच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यानंतर आता बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींचाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांचा ताजा अंदाजही जाहीर केला आहे.
कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम भागातील स्थिती :
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 72 तासांत या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असली तरी सध्या अतिवृष्टीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाड्याची तीव्रता जाणवत आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असली तरी दमदार पावसासाठी शेतकरी आणि नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Monsoon Update | मराठवाडा आणि विदर्भात कधी बदलणार वातावरण? :
कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि घाट परिसरात सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. सकाळच्या वेळेत हवामान बहुतांश कोरडे राहण्याचा अंदाज असून दुपारनंतर काही भागांत ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. या भागात कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. येथे कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या विदर्भातील जिल्ह्यांमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने तापमान वाढले आहे. मंगळवारी कोणत्याही जिल्ह्यासाठी विशेष पावसाचा इशारा नसला तरी बुधवारपासून पूर्व विदर्भातील काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील परिस्थितीवर हवामान विभागाचे लक्ष आहे.






