Ketan Agrawal Case | पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्याप्रकरणात त्याच्या आईने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेल पाठवून न्यायाची मागणी केली आहे. मुलाच्या निधनानंतर कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाचा उल्लेख करत आरोपींना कठोर शिक्षा आणि प्रकरणाचा जलद, निष्पक्ष तपास व्हावा, अशी त्यांनी भावनिक शब्दांत विनंती केली आहे.
ई-मेलमधून मांडली कुटुंबाची वेदना :
केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये आपल्या मुलाच्या हत्येनंतर कुटुंबावर आलेल्या संकटाचा उल्लेख केला आहे. आयुष्यात कधी स्वतःच्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक आईला आपल्या मुलाचे लग्न, त्याचा संसार आणि आनंदी आयुष्य पाहण्याची इच्छा असते, मात्र स्वतःच्या मुलाचा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.
ई-मेलमध्ये त्यांनी केतनच्या आठवणी आजही प्रत्येक क्षणी अस्वस्थ करत असल्याचे सांगितले आहे. घरातील प्रत्येक कोपरा, त्याची खोली, कपडे आणि छायाचित्रे त्याच्या अस्तित्वाची आठवण करून देतात. मुलाच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात असून या दुःखातून अद्याप बाहेर पडता आलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Ketan Agrawal Case | कठोर शिक्षेची केली मागणी :
राखी अग्रवाल यांनी ई-मेलमध्ये आणखी एक धक्कादायक बाब नमूद करत केतनच्या मृत्यूचा धक्का त्याच्या आजोबांना सहन झाला नसल्याने काही दिवसांतच त्यांचेही निधन झाल्याचे सांगितले. अल्पावधीतच कुटुंबाने दोन पिढ्या गमावल्या असून या दुःखाचे शब्दांत वर्णन करणे अशक्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांकडे कोणतीही विशेष सवलत किंवा सहानुभूती न मागता त्यांनी केवळ निष्पक्ष तपास आणि वेळेत न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. केतन हा आमच्यासाठी संपूर्ण जग होता आणि हे प्रकरण केवळ एका फाईलपुरते मर्यादित राहू नये, असे त्यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे. दोषींना कायद्यानुसार कठोर, फाशीपर्यंतची शिक्षा व्हावी, तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये, तसेच आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली.






