Pune ATS Raid | महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित आयएसआय संपर्कांच्या अनुषंगाने 60 हून अधिक संशयितांच्या ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली असून तपास यंत्रणांनी चौकशीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.
शहजाद भट्टी प्रकरणात मोठी छापेमारी :
एटीएसने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील 60 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहेत. प्राथमिक तपासात पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित आयएसआय संपर्कांच्या माध्यमातून भारतातील काही तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संशयित व्यक्तींची चौकशी तसेच विविध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वीही याच प्रकरणात राज्यातील विविध भागांत एटीएसने कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तपासाची व्याप्ती वाढवत पुणे जिल्ह्यात मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू असल्याचे एटीएसने सांगितले आहे.
Pune ATS Raid | सोशल मीडियातून संपर्काचे जाळे; अनेक बाबींचा तपास :
प्राथमिक तपासानुसार, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या डिजिटल नेटवर्कचा विस्तार, त्यामागील उद्देश आणि संबंधित व्यक्तींमधील संपर्कांची साखळी उलगडण्यासाठी एटीएसकडून तपास सुरू आहे. या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना अधिक पैशांचे आमिष दाखवून या नेटवर्कमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न झाला असावा. या व्यक्तींचा वापर कथित स्लीपर सेल किंवा स्थानिक एजंट म्हणून करण्याचा संशय असून गुप्त माहिती संकलन, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्रपुरवठा यांसारख्या गंभीर बाबींचाही तपास सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असलेला शहजाद भट्टी हा दुबईतून नेटवर्क चालवत असल्याचा संशय असून, भारतातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडण्याचा आरोप त्याच्यावर आहे. या संपूर्ण नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी एटीएसने तपासाची गती वाढवली आहे.






