Corona virus | देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत चिंता वाढू लागली आहे. आंध्र प्रदेशात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतही नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू यालाही कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
आंध्र प्रदेशात मृत्यू, मुंबईतही कोरोनाची नवी प्रकरणे :
देशातील काही भागांमध्ये कोविड-19 संसर्गाची प्रकरणे पुन्हा समोर येत आहेत. आंध्र प्रदेशात गेल्या काही आठवड्यांत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यात आठ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतही नव्याने कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळल्याने आरोग्य विभागाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे.
आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तीव्र खोकला आणि श्वास घेण्यास गंभीर अडचण निर्माण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी छातीच्या एक्स-रेमध्ये संसर्गामुळे दोन्ही फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाल्याचे आणि न्यूमोनिया झाल्याचे निदर्शनास आणले.
Corona virus | जान कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह; ही लक्षणे दुर्लक्षित करू नका
मुंबईत बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक जान कुमार सानू याला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे स्वतः ही माहिती दिली असून खबरदारीचा उपाय म्हणून तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर करत त्याने चाहत्यांना आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली असून, आजारपणातही त्याने आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत संवाद साधला आहे.
कोरोना संसर्गापासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक आणि रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ताप, तीव्र खोकला, अंगदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन चाचणी करावी. तसेच बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.






