RuPay कार्ड वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा? १ एप्रिलपासून ‘हे’ महत्त्वाचे नियम बदलणार

On: March 23, 2026 12:56 PM
RuPay Card Rules
---Advertisement---

RuPay Card Rules | देशातील डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये मोठे बदल होणार आहेत. विशेषतः रुपे कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी काही नियमांमध्ये सुधारणा जाहीर करण्यात आली आहे. या बदलांमुळे अनेक सुविधा पूर्वीसारख्या मोफत मिळणार नाहीत. त्यामुळे लाखो कार्डधारकांनी नवीन अटी व नियम समजून घेणे आवश्यक ठरणार आहे.

लाउंज सुविधांमध्ये मोठे बदल :

राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) यांनी बँकांना सूचना दिल्या असून 1 एप्रिल 2026 पासून रुपे (RuPay) डेबिट आणि क्रेडिट कार्डसंदर्भातील काही नियमांमध्ये बदल लागू केले जाणार आहेत. विशेषतः विमानतळ आणि रेल्वे लाउंज सुविधांबाबत मोठे बदल होणार आहेत. रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डधारकांना मिळणारी मोफत लाउंज प्रवेश सुविधा बंद करण्यात येणार आहे. (RuPay card rules)

यासोबतच रुपे सिलेक्ट कार्डधारकांसाठीही नियम बदलले आहेत. या कार्डधारकांना आता लाउंजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खर्चावर आधारित प्रणाली लागू केली जाणार आहे. म्हणजेच मागील तिमाहीत ठरावीक किमान खर्च केल्यासच लाउंज प्रवेश मिळेल. या निर्णयाचा परिणाम पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank), पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank) तसेच ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक (ESAF Small Finance Bank) यांसारख्या बँकांच्या ग्राहकांवर होणार आहे.

RuPay Card Rules | क्रेडिट कार्ड आणि खर्च नियमांमध्ये बदल :

डेबिट कार्डव्यतिरिक्त काही क्रेडिट कार्ड सुविधांमध्येही बदल जाहीर करण्यात आले आहेत. एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Airtel Axis Bank Credit Card) वापरणाऱ्या ग्राहकांना मिळणाऱ्या चार मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज भेटी 12 एप्रिल 2026 पासून बंद केल्या जाणार आहेत. मात्र काही इतर फायदे अद्याप कायम ठेवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, एअरटेल मोबाईल, ब्रॉडबँड आणि डीटीएच बिलांवर 25 टक्के कॅशबॅकची सुविधा पूर्ववत राहणार आहे.

तसेच इतर युटिलिटी बिलांवर 10 टक्के कॅशबॅक मिळत राहील. काही भागीदार प्लॅटफॉर्मवरही व्हॅल्यू बॅक सुविधा सुरू राहणार आहे. उदाहरणार्थ झोमॅटो (Zomato), ब्लिंकइट (Blinkit) आणि डिस्ट्रिक्ट मूव्हीज (District Movies) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर 10 टक्के व्हॅल्यू बॅक मिळणार आहे. विमानतळ आणि रेल्वे लाउंजच्या सुविधा आता सर्वांसाठी मोफत राहणार नाहीत. कार्डधारकांनी या सुविधा मिळवण्यासाठी ठरावीक खर्च करणे आवश्यक असेल. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या कार्डच्या अटी काळजीपूर्वक तपासून आवश्यक ते बदल लक्षात घेणे गरजेचे आहे.

News title : RuPay Card Rules Changing April

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now