Rohit Pawar Angry | गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या वादग्रस्त हाणामारीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या घटनेतील पुढील नाट्यमय घडामोडींकडे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर थेट संताप व्यक्त केला आणि त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Rohit Pawar Angry)
हा संपूर्ण प्रकार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात घडला. यावेळी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड (Jitendra aawhad) आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. एक पोलीस अधिकारी रोहित पवारांशी बोलताना हातवारे करत असल्याचे दिसताच पवारांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट सांगितले, “हातवारे करू नका… आवाज खाली ठेवा… शहाणपण करू नका…” अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
काय आहे वादामागचं नेमकं कारण? :
गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रात्री पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केली. ही घटना समजताच जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार तातडीने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले.
यावेळी रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची झाली, ज्यात पवार आक्रमक होते. पोलीस अधिकाऱ्याने हातवारे करत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता रोहित पवार यांनी आवाज वाढवून “बोलता येत नसेल, तर बोलू नका!” अशा शब्दांत त्या अधिकाऱ्याला सुनावलं. यामुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Rohit Pawar Angry | ठिय्या आंदोलन, अटक आणि पोलिसांचा हस्तक्षेप :
गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास नितीन देशमुख यांना अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरातच पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. रोहित पवारही यामध्ये सहभागी झाले होते. रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवत देशमुख यांना पोलिस ठाण्यात नेले.
या घटनेनंतर पवार समर्थकांनी पोलिसांना “साहेबांना हात लावायचा नाही” असा इशारा दिला होता. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीमुळे पोलिस ठाण्यातील तणाव काहीसा निवळला. तरीही, रोहित पवार यांचा राग व्यक्त करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे.






