Stroke problem | आधुनिक जीवनशैली आणि हार्मोनल बदलांच्या प्रभावामुळे महिलांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारतातील महिलांमध्ये वाढत्या स्ट्रोकच्या घटनांबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने चिंता व्यक्त केली आहे. 2023 च्या लॅन्सेट जर्नल च्या अहवालानुसार, 2050 पर्यंत ब्रेन स्ट्रोकमुळे 1 कोटी मृत्यू होऊ शकतात, तर 2021 मध्ये स्ट्रोक मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण तर अपंगत्वाचे सहावे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलांनी वेळीच सतर्क राहणे गरजेचे आहे.
स्ट्रोक म्हणजे काय? :
मेंदूतील रक्तपुरवठा विस्कळीत झाल्यास स्ट्रोक होतो.तसेच रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यास (इस्केमिक स्ट्रोक) स्ट्रोकचा धोका अधिक असतो. याशिवाय रक्तवाहिनी फुटल्यास (हेमरेजिक स्ट्रोक) देखील स्ट्रोक होतो. यामुळे मेंदूला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही, परिणामी मेंदूच्या पेशी मरतात आणि व्यक्ती गंभीर स्थितीत जातात. काही प्रकरणांमध्ये बोलण्यात अडथळा, शरीराचा तोल जाणे, अर्धांगवायू किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.
स्ट्रोकची लक्षणे :
– तोल जाणे
– अचानक दृष्टिदोष
– चेहऱ्याचा एक भाग लटपटणे
– एक हात निष्क्रिय होणे
– अस्पष्ट बोलणे
– त्वरित डॉक्टरांना संपर्क साधा
Stroke problem l महिलांमध्ये स्ट्रोकला कारणीभूत घटक कोणते? :
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये काही विशिष्ट कारणांमुळे स्ट्रोकचा धोका जास्त असतो. त्यामध्ये हार्मोनल बदल, जीवनशैली आणि वैद्यकीय स्थितींचा समावेश होतो.
– रजोनिवृत्तीनंतर (Menopause) इस्ट्रोजेन पातळी कमी होणे.
– हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
– गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब (Preeclampsia) आणि गर्भावस्थेतील मधुमेह (Gestational Diabetes) यामुळे स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते.
– गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन असते, ज्यामुळे रक्त गुठळ्या होण्याचा धोका निर्माण होतो.
– ज्या महिलांना उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा धूम्रपानाची सवय आहे, त्यांच्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा धोका जास्त असतो.
– धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताच्या गुठळ्या वाढतात, त्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते.
महिलांमध्ये स्ट्रोकची समस्या वाढत असली तरी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय चाचण्यांच्या मदतीने हा धोका टाळता येतो. हार्मोनल बदल, हृदयविकार आणि जीवनशैलीशी संबंधित धोके ओळखून वेळीच खबरदारी घेतल्यास महिलांचे आरोग्य चांगले राहू शकते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि स्ट्रोक टाळण्यासाठी योग्य पावले उचला.






