Rickshaw Hike | आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी फटका बसला आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रातील शेअर रिक्षाच्या भाड्यात आजपासून (23 जून 2025) प्रत्यक्ष वाढ करण्यात आली आहे. 3 ते 5 रुपयांनी भाडेवाढ झाली असून, नव्या दरामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कल्याणसह चार शहरांमध्ये दरवाढ लागू :
ही भाडेवाढ कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या प्रमुख शहरांमध्ये लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारने ही वाढ तीन महिन्यांपूर्वी जाहीर केली होती, परंतु रिक्षाच्या मीटरचे पुनर्मानांकन (रिकॅलिब्रेशन) पूर्ण न झाल्यामुळे ती तत्काळ लागू होऊ शकली नव्हती. आता जवळपास 95% रिक्षांचे मीटर अपडेट झाल्याने, आजपासून नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
नवे दर काय असणार?
नव्या भाडेवाढीनुसार:
शेअर रिक्षामधील दरात 3 ते 5 रुपयांची वाढ
प्रत्येक प्रवासासाठी मीटर दरात 3 रुपयांची वाढ
ही दरवाढ अंतर आणि प्रवासाच्या स्वरूपावर अवलंबून आहे.
Rickshaw Hike | दरवाढीमागचं कारण काय? :
रिक्षा संघटनांच्या मते, गेल्या काही महिन्यांत इंधन दर आणि वाहन देखभाल खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढीचा भार सहन करणे कठीण झाल्याने ही दरवाढ अनिवार्य ठरली. त्यानुसार प्रवाशांनीही समजून घेण्याची गरज आहे, असे रिक्षा चालक संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आधीच घरखर्च, प्रवास आणि जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणारी महागाई पाहता, ही भाडेवाढ सर्वसामान्यांसाठी नवीन आर्थिक डोकेदुखी ठरणार आहे. शासनाने इंधन दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






