Sanjay Raut | वक्फ दुरुस्ती विधेयकावर (Waqf Amendment Bill 2025) राज्यसभेत झालेल्या चर्चेवेळी शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात तीव्र वाद झाला. यावेळी पटेल यांनी राऊतांच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका करत त्यांना ‘रंग बदलणारे’ म्हटले, त्यावर राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर देत पटेल यांच्यावर भ्रष्टाचार, दलाली आणि भाजपशी सांठगाठ असल्याचे आरोप केले.
प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट आरोपांचा भडिमार केला. “ज्यांनी बापाच्या पाठीत खंजीर खुपसला, तो मला ‘रंग बदलणारा’ म्हणतो,” असा संतप्त सवाल करत त्यांनी पुढे सांगितलं की, “मोदींनी स्वतः प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली. तुरुंगाची भीती वाटू लागल्यानंतर प्रफुल्ल पटेल भाजपमध्ये गेले.”
राऊत म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणाऱ्या अमित शाह यांनीच अशा व्यक्तीला पक्षात घेतलं. प्रफुल्ल पटेल संसदेत आहेत, याची आम्हाला लाज वाटते. भाजपने दाऊदच्या हस्तकांना सामावून घेतले आणि आता ते इतरांना निष्ठेवर भाषण देतात,” असा घणाघात त्यांनी केला.
Sanjay Raut यांचा इशारा
राऊतांनी (Sanjay Raut) पुढे अजित पवारांवरही निशाणा साधला. “अजित पवारांनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलं आहे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. आधी काँग्रेसची दलाली केली, मग शरद पवार यांच्या पक्षात होते, आता दाऊदची दलाली केल्याचा संशय वाटतो,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “त्यांनी येथे आल्यावर हजारो कोटींची संपत्ती मोकळी झाली. अशा लोकांना संसदेत बोलण्याचा अधिकार तरी आहे का? आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारसरणीचे आहोत. तुम्ही आधी तुमचे रंग बघा. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलाय. प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन,” असा थेट इशाराच राऊतांनी दिला.
संजय राऊत यांनी भाजपवरही हल्ला चढवत म्हटलं की, “हे लोक महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांचा इतिहास उघड झाला, तर त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल. हे कायम वाकलेले आहेत. पाठीचा कणा नाही. मोदी आणि शाहांचे बूट चाटून क्लीनचीट मिळवली आहे. अशा भ्रष्ट लोकांना पक्षात घेऊन बहुमत मिळवलं जातं,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.






