Ram Mandir Ayodhya | 22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. याच दिवशी तमाम भारतवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले अन् अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान झाले. अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकानंतर देशभरात दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळाले. विविध शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. लोकांनी घरोघरी दिवे लावून हा सोहळा सणासारखा साजरा केला.
दीपोत्सवासोबतच लोक फटाकेही फोडून आनंदोत्सव साजरा करताना दिसले. त्याचबरोबर जगातील अनेक देशांमध्ये हिंदू बांधवांकडून हा उत्सव साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी देखील सोमवारी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानंतर त्यांच्या निवासस्थानी दिवे लावून आनंद साजरा केला.
देशभरात दीपोत्सव!
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राजकारण देखील चांगलेच तापले होते. बहुतांश विरोधी नेते अभिषेक सोहळ्यापासून दूर राहिले आणि त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक पक्षांच्या नेत्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते परंतु त्यांनी जाण्यास नकार दिला. अभिजीत मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाचा अभिषेक झाला.
Ram Mandir Ayodhya अन् एकच जल्लोष
रामललाच्या अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी सहभागी झाले होते. रामललाच्या अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केले. अयोध्येहून दिल्लीला परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी सौरऊर्जेसंदर्भात ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजने’ची घोषणा केली.
सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं।
आज अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो।
अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि… pic.twitter.com/GAzFYP1bjV
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेची माहिती देताना म्हटले, “अयोध्येहून परतल्यानंतर पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करत आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, याशिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.”
राम आग नाही राम ऊर्जा आहे – मोदी
रामललाचा अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, एक काळ असाही होता जेव्हा काही लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर सर्वत्र आग लागेल, अशा लोकांना भारताच्या सामाजिक भावनेचे पावित्र्य समजले नाही. रामललाच्या या मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. आपण पाहत आहोत की मंदिराचे बांधकाम कोणत्याही आगीला जन्म देत नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. त्यामुळे राम आग नाही तर राम ऊर्जा आहे.






