‘जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही…’; राज ठाकरेंचं जरांगेंना पत्र

On: October 31, 2023 3:04 PM
---Advertisement---

मुंबई | आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच राज्यातही मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसतंय. बीडमध्ये तसेच महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रतिक्रिया देत जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे.

राज ठाकरेंनी जरांगेंना पत्र लिहिलं आहे. तसेच हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केलं आहे. इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे, असं राज ठाकरे म्हणालेत.

तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.

जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढयांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी जरांगेंना विनंती केली आहे.

दरम्यान, आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. सर्व मराठी एक असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू.. पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे, असं राज ठाकरेंनी पत्राच्या शेवटी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now