अर्बन नक्षलपेक्षा इथे लक्ष द्या! राज ठाकरेंनी सरकारला फटकारले, नेमका कशावरून दिला इशारा?

On: August 21, 2025 1:22 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारला अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरून सुनावले असून शहर नियोजन, वाहनतळ आणि रस्त्यावरील पार्किंग यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन जवळपास ५० मिनिटे चर्चा केली. मात्र ही भेट राजकीय नसून शहर विकासाच्या मुद्यांवर केंद्रित होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

पार्किंग आणि वाहनतळावर कठोर मत :

राज ठाकरे यांनी गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या ट्रॅफिक समस्येवर भर देत पार्किंगसाठी शुल्क आकारण्याची गरज असल्याचे सांगितले. “सर्वच गोष्टी फुकट मिळत नाहीत. गाड्यांच्या किंमती पाहिल्या तर महिन्याला दोन-तीन हजार रुपये पार्किंग शुल्क द्यायला हरकत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी दादरमधील महागड्या जमिनींचा उल्लेख करत रस्त्यावर गाड्यांनी व्यापलेल्या जागेचे मूल्यांकन करण्याची कल्पना मांडली.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतियांचा ओघ सुरू असल्यामुळे पायाभूत सुविधा ताणल्या जात असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. “रस्ते मोठे होत नाहीत पण इमारती मात्र उंचावत आहेत. रोज या शहरांवर लोकसंख्येचा दबाव वाढत आहे. बाहेरील राज्ये विकसित केली पाहिजेत, पण त्यातल्या त्यात हातातले विषय नीट सोडवले पाहिजेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Raj Thackeray)

Raj Thackeray | ‘अर्बन नक्षलपेक्षा इथे लावा शिस्त’ :

सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा. शहर विकास, रस्ते, पार्किंग आणि नियोजन हेच सध्या सर्वात महत्त्वाचे विषय आहेत.” त्यांनी अदानी ग्रुपला मिळणाऱ्या जमीन प्रकल्पांपासून ते धारावीच्या पुनर्विकासापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच पुण्यातील असमाधानकारक परिस्थितीचा दाखला देत, फक्त मेट्रो आणि फ्लायओव्हर्सने प्रश्न सुटणार नाहीत, वाहतूक नियंत्रणाची गरज आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शहर विकासातील त्रुटींचा पाढा वाचताना लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा उपस्थित केला. “कायदे आहेत, पण ऑर्डर नाही. डीपी (डेव्हलपमेंट प्लॅन) बनतो पण टीपी (टाऊन प्लॅनिंग) होत नाही. हीच खरी समस्या आहे,” अशी टीका त्यांनी केली. यामुळे सरकारसमोर शहर विकास आणि वाहतूक नियोजन या मुद्यांवर ठोस पावले उचलण्याचा दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसून आला.

News Title: Raj Thackeray targets govt: “Maintain discipline here, not Urban Naxalism”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now