राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांवर संतापले! दिला ‘हा’ अंतिम इशारा

On: June 26, 2026 12:27 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | मुंबईत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी आता प्रत्येक पदाधिकाऱ्याने मैदानात उतरून सक्रियपणे काम करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी बजावले. 29 जूनपर्यंत कामगिरीत सुधारणा दिसली नाही तर संबंधित पदाधिकाऱ्यांना थेट पदावरून हटवले जाईल, असा अल्टिमेटम त्यांनी दिला.

राज ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले की, वारंवार सूचना देण्याची वेळ आता संपली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्यांनी घरात बसून न राहता लोकांमध्ये जाऊन संघटन मजबूत करावे. पक्षाच्या वरिष्ठांकडून येणाऱ्या अहवालानुसार कामाचे मूल्यमापन होईल आणि समाधानकारक काम न करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एसआयआर मोहिमेला गती देण्याच्या सूचना :

बैठकीत राज ठाकरे यांनी एसआयआर संदर्भातील कामाला अधिक वेग देण्याचे निर्देश दिले. मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर बीएलए (Booth Level Agent) नियुक्त करण्यावर त्यांनी भर दिला. मुंबई शहरात सुमारे 3 हजार आणि उपनगरात 8 हजार बीएलए नियुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र सध्या मनसेकडे केवळ 997 बीएलए नोंदणीकृत असल्याची बाब त्यांनी गंभीरतेने उपस्थित केली.

विभागाध्यक्षांनी आपल्या विभागात अधिक सक्रिय राहून सातत्याने दौरे करावेत, कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवावा आणि संघटन विस्तारासाठी प्रयत्न करावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. 29 जूननंतरही तक्रारी कायम राहिल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Raj Thackeray | जैन समाजाच्या शिष्टमंडळालाही सुनावले

बैठकीनंतर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या घटनेबद्दल शिष्टमंडळाने दिलगिरी व्यक्त करत कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले.

यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याच्या घटनांवरही नाराजी व्यक्त केली. अशा कृतींमुळे मराठी आणि जैन समाजात अनावश्यक वाद निर्माण होत असल्याचे सांगत, मराठी अस्मितेचा आदर राखणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. समाजात शांतता आणि परस्पर सन्मान कायम ठेवण्यासाठी अशा घटना तातडीने थांबल्या पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.

News Title : Raj Thackeray Issues Final Warning to MNS Workers, Sets June 29 Deadline for Performance

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now