Ketan Agarwal Death | केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या चौकशीतून आता अत्यंत अंगावर काटा आणणारा आणि थरारक घटनाक्रम समोर आला आहे. केतनचा मृत्यू हा अचानक घडलेला अपघात नसून, त्याचा काटा काढण्यासाठी तब्बल ३ वेळा अयशस्वी प्रयत्न झाले होते. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याचा जीव घेण्यात आला. पोलिसांनी उघड केलेला हा धक्कादायक घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:
३ वेळा हत्येचा प्रयत्न फेल; साप आल्याचा केला बनाव
तपासातून समोर आले आहे की, केतनच्या हत्येचा कट अनेक आठवडे आधीच रचण्यात आला होता, पण प्रत्येक वेळी तो फसला:
पहिला प्रयत्न (३१ मे): सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. एका निर्जन कड्यावरून केतनला खाली ढकलून तो अपघात भासवण्याचा बेत होता, पण सियाला ऐनवेळी धाडस झाले नाही.
दुसरा प्रयत्न (४ जून): १ जून रोजी पुन्हा एक नवीन ‘अचूक’ योजना आखण्यात आली, परंतु ४ जून रोजी काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
तिसरा प्रयत्न (१४ जून): सिया आणि केतन पुन्हा एकदा लोहगडावर गेले. यावेळी सियाने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचला. आपले धैर्य खचल्यामुळे सियाने तिथे अचानक ‘साप’ आल्याचा बनाव रचून केतनसमोर नाटक केले होते.
बाली ट्रिप रद्द करण्यासाठी केतनचा पासपोर्ट टॉयलेटमध्ये ‘फ्लश’ केला!
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि केतन यांचा ६ जून रोजी बालीला (Bali) जाण्याचा प्लॅन होता. मात्र, केतनचा या सहलीला तीव्र विरोध होता आणि त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते.
विमानतळावरील तो हायड्रॉमा:
मुंबई विमानतळाकडे जात असताना सियाने तिचा मोबाईल फोन गाडीतच विसरल्याचे नाटक केले. त्यानंतर ती तातडीने वॉशरूममध्ये गेली आणि तिथे तिने केतनचा पासपोर्ट फाडून तो टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकला. पासपोर्ट गहाळ झाल्यामुळे अखेर त्यांची बालीची आंतरराष्ट्रीय ट्रिप रद्द करावी लागली. या विचित्र प्रकारामुळे केतनला सियावर संशय आला होता आणि त्यांच्यातील वाद आणखी वाढले होते.
“तुला जमणार नाही, आता केतनला मीच संपवेन” – चेतनचा संयम सुटला
१४ जूनचा तिसरा प्लॅनही फेल झाल्यानंतर प्रियकर चेतन चौधरीचा संयम सुटला. त्याने सियाला स्पष्ट शब्दांत सुनावले, “आता १८ तारखेसाठी नवीन योजना आहे. केतनचा जीव मीच घेईन; हे काम तुला जमणार नाही.”
१८ जूनचीच तारीख का निवडली? ‘वाढदिवसाचे’ कनेक्शन
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस (Birthday) होता आणि त्या दिवशी केतन तिला सेलिब्रेशनसाठी महाबळेश्वरला घेऊन जाणार होता. कोणत्याही परिस्थितीत सियाने केतनसोबत महाबळेश्वरला जाऊ नये, अशी चेतनची इच्छा होती. म्हणूनच, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ जून ही तारीख हत्येसाठी निश्चित करण्यात आली.
नोकराचा फोन आणि चॅट मेसेजेसचा भक्कम पुरावा
१८ जून रोजी चेतनने पहिल्यांदाच लोहगड किल्ल्याला एकट्याने भेट दिली होती. पोलिसांच्या तांत्रिक तपासापासून वाचण्यासाठी त्याने स्वतःचा फोन घरी ठेवून दुकानातील कर्मचारी नीरज कुमार याचा मोबाईल वापरला. १८ जून या संपूर्ण दिवसात सिया आणि चेतन चॅट मेसेजेसद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. हे डिलिट केलेले मेसेजेस आता पोलिसांच्या हाती लागले असून तो या प्रकरणातील सर्वात भक्कम तांत्रिक पुरावा ठरला आहे.
ना खेद, ना खंत; आता एकमेकांवर ढकलत आहेत आरोप
पोलीस चौकशीत समोर आलेली सर्वात क्रूर बाब म्हणजे, केतनचा इतक्या भयानक पद्धतीने जीव घेऊनही दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर ना खेद आहे ना कोणताही पश्चात्ताप.
परंतु, आता कायदेशीर कारवाईच्या भीतीने दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. चेतनचा दावा आहे की सियाने केतनला कड्यावरून धक्का दिला, तर सियाचा दावा आहे की चेतननेच केतनला लोहगडावरून खाली ढकलले. लोणावळा ग्रामीण पोलीस आणि फॉरेन्सिक टीम डिजिटल पुराव्यांच्या आधारे नेमका धक्का कोणी दिला, याचा अंतिम शोध घेत आहेत.
News Title: Ketan Agarwal Death 3 attempts to kill failed Siya Goyal Chetan Choudhary shocking revelation






