Ketan Agarwal Death | पुण्यातील (Pune) तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ला (Lohagad Fort) मर्डर मिस्ट्रीमध्ये दररोज थक्क करणारे खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांच्या चौकशीदरम्यान तपासाला एक अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. लग्न मोडल्यास होणाऱ्या कौटुंबिक बदनामीच्या भीतीने थेट हत्येचा कट रचल्याची धक्कादायक कबुली सियाने तपासादरम्यान दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात समोर आलेले नवीन खुलासे खालीलप्रमाणे आहेत:
‘लग्न नको होते तर नकार का दिला नाही?’
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने चौकशीत स्पष्ट केले की तिला केतनशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण तिचे चेतन चौधरीसोबत जुने प्रेमसंबंध होते. यावर तपास अधिकाऱ्यांनी तिला थेट प्रश्न विचारला, “जर तुला हे लग्न मान्य नव्हते, तर तू तुझ्या पालकांना किंवा अग्रवाल कुटुंबाला स्पष्ट शब्दांत नकार का दिला नाहीस?”
या प्रश्नावर सियाने दिलेले उत्तर ऐकून पोलीसही चक्रावून गेले. तिने सांगितले की:
“जर मी लग्न मोडले असते, तर समाज आणि नातेवाईकांमध्ये दोन्ही कुटुंबांची मोठी बदनामी झाली असती. आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, अशी मला भीती वाटत होती. कौटुंबिक इभ्रत वाचवण्यासाठी आणि केतनला कायदेशीररित्या नाकारता येत नसल्यामुळे, आम्ही त्याला कायमचे वाटेतून हटवण्याचा (हत्येचा) दुसरा भयंकर मार्ग निवडला.”
गुन्ह्यासाठी ‘लोहगड’ किल्ल्याचीच निवड का केली?
तपास यंत्रणांनी केलेल्या दाव्यानुसार, आरोपींनी अतिशय विचारपूर्वक लोहगड किल्ल्याची निवड केली होती. त्यामागे त्यांची दोन प्रमुख गणिते होती:
अपघाताचा आभास निर्माण करणे सोपे: ट्रेकिंगदरम्यान कड्यावरून पाय घसरून पडल्यास तो एक नैसर्गिक अपघात वाटेल आणि कोणालाही संशय येणार नाही, असा आरोपींचा समज होता.
मर्यादित सीसीटीव्ही कॅमेरे: गडाच्या मुख्य आणि अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा नसल्यामुळे आपण पोलिसांच्या नजरेतून आणि तांत्रिक पुराव्यांतून सहज वाचू, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, पोलिसांनी गडाच्या बाहेरील आणि रस्त्यांवरील फुटेज शोधून त्यांचा हा बेत हाणून पाडला.
केतनबाबत वैयक्तिक नाराजी असल्याचाही संशय
तपासादरम्यान पोलीस सूत्रांकडून असाही दावा केला जात आहे की, सियाला केतनच्या काही वैयक्तिक सवयी किंवा बाबी पसंत नव्हत्या, ज्यावरून त्यांच्यात खटके उडत होते. सियाला केतन (Ketan Agrawal) हा मनापासून कधीच पसंत पडला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील दोन उणीवा सियाला खटकायच्या. केतनला टक्कल होते. तो केसांचा टोप वापरत होता. ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती. याशिवाय, केतन बोलताना अडखळायचा. सिया आणि केतनचे लग्न ठरले तेव्हा गोयल कुटुंबाला या गोष्टीची माहिती होती. मात्र, त्यांना याचे फारसे विशेष वाटले नाही. परंतु, या दोन गोष्टींमुळे सियाला कितीही प्रयत्न करुनही केतन अग्रवाल पसंत पडत नव्हता. मात्र, या वैयक्तिक नाराजीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हत्येमागील सर्वात मुख्य आणि एकमेव मोठे कारण म्हणजे सियाचे चेतनसोबत असलेले कथित प्रेमसंबंध हेच आहे.
सियाला भेटायला कुटुंबातील कोणीही गेले नाही; भाऊ ‘साहिल’ची चौकशी सुरू
या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मोठी कौटुंबिक घडामोड समोर आली आहे. अटकेला अनेक दिवस झाले असूनही, सियाच्या कुटुंबातील एकही सदस्य तिला पोलीस ठाण्यात किंवा कारागृहात भेटण्यासाठी गेलेला नाही. तिच्या या कृत्यामुळे कुटुंबाने तिच्यापासून पूर्णपणे अंतर ठेवल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, तिचे वडील प्रवीण गोयल हे अद्यापही प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर या प्रकरणात इतर कोणाचा हात आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या पोलीस ठाण्यात साहिलची कसून चौकशी केली जात असून, हत्येच्या कटाची त्याला काही पूर्वकल्पना होती का, याचा शोध लोणावळा ग्रामीण पोलीस घेत आहेत.
News Title: Ketan Agarwal death Case Sia goyal did not like these 2 things about ketan new claims revealed






