Rain Alert | राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं असून पुणे, नाशिक, विदर्भ व मराठवाडा भागात पावसाने सतत हजेरी लावली आहे. येत्या पाच दिवसांमध्येही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं असून मराठवाड्यात विशेषतः उकाडा प्रचंड जाणवतो आहे.
मराठवाड्यात पुढील पाच दिवस कुठे पाऊस होणार?
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार 13 मे रोजी बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वारे (वेग 50-60 कि.मी./तास), विजांचा कडकडाट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain Alert) होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांनाही पावसाचा सामना करावा लागू शकतो. 14 मे रोजी संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर, 15 मे रोजी बीड व धाराशिव आणि 16 मे रोजी धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्येही अशीच स्थिती राहणार आहे. कमाल तापमानात मोठा बदल होणार नसला तरी किमान तापमानात किंचित घट होऊन पुढे वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी काय?
हवामान विभागाने इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकांची उकडणी, वाळवण व पॉलिशिंग करून ती गोदामात ठेवावी. उन्हाळी भुईमूग पिकात तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावं आणि तयार पिकांची काढणी करून सुरक्षित ठेव करावी.
फळबागांसाठी विशेष सल्ला-
केळी झाडांना काठीने आधार देऊन घडांची तात्काळ काढणी करावी. सरीवरंबा पद्धतीने (Rain Alert) पाणी देऊन झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादन केल्यास मातीतील ओलावा टिकतो. नव्याने लावलेल्या रोपांना उन्हापासून सावली द्यावी. आंबा फळ तयार असेल तर त्याची तातडीने काढणी करावी. वादळी वाऱ्यामुळे गळून पडलेली फळे व तुटलेल्या फांद्या गोळा करून विल्हेवाट लावावी. पाण्याची कमतरता टाळण्यासाठी आंबा बागेतही योग्य पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे.
द्राक्षबागांमध्ये खत व्यवस्थापनासह माती मोकळी करावी. एप्रिल छाटणी अजून बाकी असल्यास ती 15 मेपूर्वी पूर्ण करावी. मात्र छाटणी करताना हवामान कोरडं असल्याची खात्री करावी, म्हणजे पावसामुळे नुकसानीचा धोका टाळता येईल.






