Raigad News | रायगड (Raigad) जिल्ह्यातील उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील 20 गावांमध्ये आणि 103 वाड्यांमध्ये (Wadi) टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात 24 टँकर कार्यरत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
ग्रामीण भागात टँकरसाठी वाढते बुकिंग-
उन्हाळ्याच्या झळाळत्या तापमानामुळे ग्रामीण भागात भूगर्भातील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे शेततळे, विहिरी आटल्या असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विविध गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी शासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात (Raigad News) 65 हजार 631 नागरिकांना शासनमान्य टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जास्त तीव्र आहे. काही ठिकाणी नागरिकांना बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. वाड्यांमध्ये पाणी पोहचवण्यासाठी सुमारे 20 वाड्यांत टँकरद्वारे नियमित पुरवठा सुरु आहे. काही भागात टँकर मागणीसाठी आडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे.
पाण्याच्या टंचाईवर तातडीने उपाययोजना सुरू-
पाण्याच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये (Raigad News) असंतोष निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये अधिक टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, विहिरींची साफसफाई व देखभाल करून पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पाणीपुरवठा विभागाचे (Water Supply Department) सांगणे आहे की, उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.






