Raigad | माणगाव (Mangaon) शहरातील वाहतूक समस्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून, सध्या येथे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे आणि राजकारण्यांचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांचा त्रास-
शहराच्या मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी, अतिक्रमण, आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, आणि कुठलाही वाहतूक नियोजन नसल्याने अपघातांची शक्यता सतत वाढत आहे. शाळा, रुग्णालये आणि बाजारपेठेच्या परिसरात गोंधळाचे वातावरण असून, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
स्थानिक (Raigad) लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी निवेदन दिल्याचे सांगितले जाते, परंतु प्रशासन आणि नेतेमंडळी केवळ निवडणुकीपुरते आश्वासने देतात आणि नंतर दुर्लक्ष करतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. रस्त्यांवरून चालणाऱ्यांपासून वाहनधारकांपर्यंत प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागत आहे.
तरुणांचा रोष; आंदोलनाची तयारी सुरू-
या समस्यांबाबत (Raigad) प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीही बदल न झाल्यामुळे शहरातील तरुणांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल’, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
माणगावातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक एकत्र येऊन या समस्येबाबत ठोस भूमिका घेत आहेत. ‘सततच्या अपघातांच्या घटनांनंतरही प्रशासन शांत का आहे?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ हालचाल न केल्यास जनआक्रोश वाढण्याची शक्यता आहे.






