‘विमानतळ आमच्या प्रेतांवरूनच होईल’; पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध

On: April 29, 2025 12:15 PM
Purandar News
---Advertisement---

Purandar Airport | पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Proposed International Airport) स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे. आमरण उपोषणानंतर, सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी ४० अंश सेल्सियस तापमानात आणि रखरखत्या उन्हात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला. ‘विमानतळ आमच्या प्रेतांवरूनच होईल,’ असा निर्वाणीचा इशारा देत, जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

सात गावांतील शेतकऱ्यांचा एल्गार

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमीन या विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे. याला विरोध करण्यासाठी या गावांमधील हजारो शेतकरी, महिला आणि लहान मुले सोमवारी अल्पबचत भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मोर्चात सहभागी झाले होते.

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील (B. G. Kolse Patil) यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘विमानतळ होऊ देणार नाहीच’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गायकवाड (Manjusha Gaikwad) म्हणाल्या, “हा तालुका नष्ट करण्याचे कटकारस्थान असून, आमचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.”

भूसंपादनाला विरोध, प्रशासनाला निवेदन

शेतकऱ्यांनी भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसल्याचा आरोप केला. आम्हाला आमची जमीन द्यायची नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींना अधिकार आहेत आणि सातही गावांनी विमानतळाला विरोधाचे ठराव केले आहेत, तरीही सरकार ते विचारात घेत नाही, हा अन्याय असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आंदोलकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी (Suhas Mapari) आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (Jyoti Kadam) यांना मागण्यांचे निवेदन दिले. ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी तात्काळ थांबवावी, अन्यथा शेतकरी आपले जीवन संपवतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख पी. एस. मेमाणे (P. S. Memane) यांनी खरी लढाई पुढे असून, जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. “सात गावांतील जागा विमानतळासाठी योग्य नाही, हे लष्करी अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे. मी पूर्वीही विरोध केला होता. आता पूर्वीचेच लोक सत्तेत आल्याने जाणीवपूर्वक हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे म्हणत त्यांनी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “सध्याची जागा तात्पुरती आहे. मी कायम तुमच्यासोबत राहून प्रकल्पाला विरोध करेन,” असे आश्वासन जगताप (Jagtap) यांनी दिले.

News Title- Purandar Airport Protest March Held in Pune

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now