Pune Bus Rule | पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शहरातील खासगी बस वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यासाठी नवे मार्ग, बस थांबे आणि नियम लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे खासगी बस कंपन्यांना ठरवलेल्या मार्गाशिवाय इतरत्र प्रवास करण्यास परवानगी राहणार नाही. तसेच बस थांब्यावर फक्त तीन मिनिटे थांबण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. (Pune Bus Rule)
अनेक वर्षांपासून पुण्यात खासगी बस आणि शहरातील वाहतूक यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या समस्येवर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी बस थांबे आणि मार्गांचे पुनरावलोकन करून नवीन नियोजन केले आहे. यावर नागरिकांना 15 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना देण्याची संधी देण्यात आली आहे.
नवे मार्ग आणि थांबे निश्चित :
या नव्या नियमानुसार पुण्यातील विविध महत्त्वाच्या भागांवर खासगी बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कात्रज, पद्मावती, सातारा रस्ता, मार्केट यार्ड, संगमवाडी, निगडी, चांदणी चौक, हडपसर, वाघोली, मुळा रस्ता अशा प्रमुख ठिकाणी ठराविक बिंदूंवरच वाहतूक परवानगी देण्यात आली आहे. काही मार्गांवर थांबे निश्चित असून काही मार्गांवर कोणताही थांबा ठेवण्यात आलेला नाही. (Pune Bus Rule)
मुंबई, नाशिक, नगर आणि सोलापूर रस्त्यावरून येणाऱ्या बसांना पुण्यात प्रवेश करताना ठराविक पॉइंट्सवरच थांबण्याची परवानगी असेल. अवैध ठिकाणी थांबून बसमधून प्रवासी घेणे–सोडणे या प्रकारांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
Pune Bus Rule | कडक अंमलबजावणी आणि दंडाची तरतूद :
पुणे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की आता बसचालकांनी ठरवलेल्या मार्गावरूनच गाडी चालवावी लागेल. बसने ठराविक थांब्यावर 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास त्या बसवर दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रमुख चौकांवर बसमुळे होणारा ट्रॅफिक जाम कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरात येणाऱ्या सुमारे हजारो खासगी बसेसमुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार होत होती. या नियमनामुळे बस सेवेत वेग, शिस्त आणि पारदर्शकता निर्माण होणार आहे. प्रवाशांना बस वेळेवर मिळेल आणि वाहतुकीची गती सुधारेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.






