पुणेकरांनो, आज बसने जाणार असाल तर सावधान! PMPML च्या बस फेऱ्या रद्द

On: January 19, 2026 1:36 PM
Pune Smart Bus
---Advertisement---

PMPML Bus Cancellation | पुण्यात आज (सोमवार, 19 जानेवारी) आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. शहरातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात आल्याने PMPML च्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, दीडशेहून अधिक मार्गांवर बदल करण्यात आला आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमानी आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत फर्ग्युसन कॉलेज रोड (FC रोड), जंगली महाराज रोड (JM रोड) आणि गणेशखिंड रोड पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गांवरून धावणाऱ्या हजारो बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तसेच, या भागातील महत्त्वाचे डेक्कन बसस्थानकही आज बंद ठेवण्यात आले असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सायकल स्पर्धेमुळे मोठे वाहतूक बदल :

‘प्रोलॉग’ शर्यतीसाठी शहरातील मध्यवर्ती भागातून स्पर्धा मार्ग निश्चित करण्यात आला असून, खंडुजीबाबा चौक, गुडलक चौक, रेंजहिल्स, संचेती चौक आणि बालगंधर्व परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रस्ते बंद असल्याने PMP प्रशासनाने सुमारे दीडशे बस मार्ग वळवले आहेत. मात्र, तरीही दोन हजार फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

कामाच्या दिवशीच हे बदल झाल्याने कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी प्रवास अधिक कठीण झाला आहे. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

PMPML Bus Cancellation | प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था, तरीही गैरसोय कायम :

प्रवाशांचे हाल कमी व्हावेत यासाठी PMP प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख रस्ते बंद असल्याने नागरिकांना शहराला वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी घराबाहेर पडण्याआधी मार्गांची माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जागतिक दर्जाच्या स्पर्धेमुळे पुण्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उजळले असले, तरी सोमवारी शहरातील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

News Title: Pune Traffic Chaos on Monday: PMP Cancels 2000 Bus Trips, Deccan Bus Stand Shut

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now