Pune News | पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. आता या प्रकरणामागील कारण आणि दारू विषारी कशी बनली याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा कमावण्याच्या हव्यासातून दारूमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.
मिथेनॉलमुळे दारू ठरली जीवघेणी :
समोर आलेल्या माहितीनुसार, उरळी कांचन (Uruli Kanchan) परिसरातील राधेश्याम प्रजापती (Radheshyam Prajapati) हा बेकायदेशीररीत्या दारू तयार करण्याचं काम करत होता. त्याच्याकडून योगेश वानखेडे (Yogesh Wankhede) नावाचा तरुण दारू खरेदी करून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध दारू गुत्त्यांवर विक्री करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश वानखेडे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
यावेळी अधिक पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्याने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचे समोर आले आहे. मिथेनॉल मिसळल्याने दारूचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे विक्रेत्याला अधिक नफा मिळतो. मात्र, यावेळी हे रसायन जास्त प्रमाणात मिसळल्याने दारू विषारी बनली. हीच दारू अनेक ठिकाणी विकली गेल्याने मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
Pune News | अनेक भागांत झाली विक्री :
योगेश वानखेडे (Yogesh Wankhede) याने ही दारू पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी (Phugewadi) परिसरात गुत्ता चालवणारे कर्नेल सिंह विरका (Kernel Singh Virk) आणि गुरमित सिंह विरका (Gurmeet Singh Virk) या बापलेकांना विकल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पुण्यातील खडकी (Khadki) भागात कल्पेश अग्रवाल (Kalpesh Agrawal), वडारवाडी (Wadarwadi) परिसरात अरिहंत धोत्रे (Arihant Dhotre), तसेच हडपसर (Hadapsar) आणि काळेपडळ (Kalepadal) भागात आकाश जाधव (Akash Jadhav) आणि अशोक हांडे (Ashok Hande) यांनाही ही दारू पुरवण्यात आली होती.
या दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मृत्यूंची मालिका सुरू झाली. पिंपरी चिंचवडमध्ये 8 आणि पुण्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. मात्र, स्थानिकांच्या मते मृतांचा आकडा अधिक असू शकतो. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा आणि पुणे पोलिसांनी दोन अशा एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. उरळी कांचन (Uruli Kanchan) हा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने पुणे ग्रामीण पोलीस, पुणे शहर पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस या तिन्ही यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






