Abhijeet Dipke | जंतर-मंतर (Jantar Mantar) येथील आंदोलनानंतर आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्ली पोलिसांवर (Delhi Police) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले. तसेच विद्यार्थ्यांना त्रास दिल्यास पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र :
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकी संदर्भातील आरोप फेटाळून लावले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जंतर-मंतरवरील आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते आणि त्यात सहभागी झालेले विद्यार्थी हिंसक नव्हते. आंदोलनात दगडफेक करणारे लोक आंदोलनकर्ते नसून भाजपशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. जंतर-मंतर परिसरात दगडांनी भरलेला ट्रक कसा पोहोचला, याबाबत आपण पोलिसांकडे विचारणा केली असता तो दिल्ली महापालिकेचा असल्याचे उत्तर मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास हरकत नसल्याचे सांगितले, मात्र त्या घटनेचा आधार घेऊन विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. मुंबई (Mumbai), बिहार (Bihar) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) येथील विद्यार्थ्यांवर कारवाई का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरल्याचा तसेच बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर एके-47 वापरल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, निशू नावाच्या मुलीच्या वडिलांवर झालेल्या कथित हल्ल्यात संबंधितांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप करत, त्या काळात सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
Abhijeet Dipke | पोलिसांवर गंभीर आरोप, सरकारला इशारा
अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, काही मुलींचे कपडे फाडण्यात आले, त्यांच्या डोक्यावर लाठ्यांनी मारहाण करण्यात आली तसेच काही विद्यार्थिनींवर अयोग्य पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. तसेच, पोलिसांच्या कुटुंबीयांना पुढे करून आंदोलनकर्त्यांवर आरोप करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.






