तू टॉर्च मारुन बसमध्ये चढ अन् मग त्याने… स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेची आपबीती

On: February 26, 2025 3:48 PM
Pune Swargate Crime Woman Assaulted, Accused Identified
---Advertisement---

Pune Swargate Crime | पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित तरुणीला गोड बोलून बसकडे नेले आणि त्यानंतर अमानुष कृत्य केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथकं तयार केली असून तपास वेगाने सुरू आहे. (Pune Swargate Crime)

गोड बोलून फसवणूक, शिवशाही बसमध्ये अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी स्वारगेट एसटी स्थानकात बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) तिच्याशी संवाद साधत गेला. कुठे जायचं आहे, अशी चौकशी करून त्याने विश्वास संपादन केला. पीडितेने तिला फलटणला जायचं असल्याचं सांगितलं. त्यावर आरोपीने दिशाभूल करत फलटण बस इथे लागत नाही असं सांगितलं.

त्यानंतर त्याने तिला एक बस दाखवत हीच गाडी फलटणला जाईल असं सांगितलं. पीडितेला संशय आल्याने तिने बसमध्ये अंधार असल्याचं सांगितलं. त्यावर आरोपीने तिला टॉर्च लावून पाहण्यास सांगितलं. ती बसमध्ये गेल्यानंतर आरोपीने मागून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने आरोपी बाहेर पडला आणि त्यानंतर पीडित तरुणी बाहेर येऊन दुसऱ्या बसमध्ये बसली.

सीसीटीव्ही फुटेजमधून ओळख पटली, आरोपीचा शोध सुरू

या घटनेनंतर पीडितेने मित्राला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मित्राने तिला तातडीने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. दत्तात्रय गाडे हा शिरूर गावचा रहिवासी असून, त्याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथकं तयार केली असून पुण्यासह परिसरात तपास सुरू आहे. आरोपीच्या कॉल रेकॉर्ड्स आणि पूर्वीच्या गुन्ह्यांच्या तपशीलावरून त्याचा माग काढला जात आहे. (Pune Swargate Crime)

महिला सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर स्वारगेट एसटी स्थानकातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, पेट्रोलिंग सुरू असतं, मात्र प्रत्येक बस तपासणं शक्य होत नाही. घटनास्थळी कोणी मदतीसाठी धावलं असतं, तर कदाचित वेळीच काही कारवाई करता आली असती. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपी लवकरच गजाआड होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Title : Pune Swargate Crime Woman Assaulted, Accused Identified

 

Join WhatsApp Group

Join Now